‘न्यायाधार’ला राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

महिलांच्या न्याय हक्कांसाठी काम करणार्‍या नगरच्या महिला वकील संचलित ‘न्यायाधार’ संस्थेला सातारा येथील लेक लाडकी अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्री बाई फुले संघर्ष पुरस्काराने गौरविण्यात आले. छत्रपती संभाजी या मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. अभियानाच्या संचालिका तथा दलित महिला मंडळाच्या अ‍ॅड.वर्षा देशपांडे, अ‍ॅड.शैला जाधव प्रमुख उपस्थित होत्या.

संस्थेने महिलांसाठी असलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम 498 अ (पत्नीला पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने क्रुर वागणुक देणे) च्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिलेल्या लढ्याला मिळालेल्या अभूतपुर्व यशाबद्दल या वर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संघर्ष पुरस्कार न्यायाधारला दिला जात असल्याचे अ‍ॅड.वर्षा देशपांडे यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या वतीने अ‍ॅड.निर्मला चौधरी, अ‍ॅड.मंदाकिनी चन्ना, अ‍ॅड.माया सोसे, अ‍ॅड.निलिमा बंडेलू, अ‍ॅड.विजया काकडे, अ‍ॅड.स्मिता मुरुमकर, अ‍ॅड.निलीमा भणगे या महिला वकिलांनी सदर पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, सन्मानचिन्ह व सात हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोच्च न्यायालया पर्यंन्त यशस्वी लढा देत, ‘न्यायाधार’ने महिलांच्या हक्काचे रक्षण करुन त्यांना मोठा दिलासा दिल्याचे प्रताप गंगावणे यांनी सांगून न्यायाधारच्या कार्याचा गौरव केला.