
9 नोव्हेंबर हा दिवस हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा लागेल असे सांगतानाच अयोध्याप्रश्नी दिलेल्या निकालाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. या ऐतिहासिक घटनेचा आनंद साजरा करण्यासाठी लवकरच अयोध्येला जाणार अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदूंना आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येणे स्वाभाविक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अनेक वर्षे सुरू असलेल्या वादावर आज पडदा पडला. त्याबद्दल सर्वप्रथम न्यायदेवतेला आपण साष्टांग दंडवत घालतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. इतकी वर्षे आपण प्रभू रामचंद्र होते, त्यांनी रावणाचा वध केला अशा कथा ऐकत होतो, परंतु त्यांचा जन्म नेमका कुठे झाला, होता की नव्हता यावर वाद सुरू होता. तो वाद आज संपलेला आहे असे सांगतानाच हिंदू, मुस्लिम आणि इतर सर्वच धर्मीयांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्वीकारल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यात सरकारचे श्रेय असेल-नसेल, पण न्यायदेवतेचा न्याय आनंद देणारा आहे, असे ते म्हणाले.
आडवाणींचीही भेट घेणार
विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांची आज आठवण येते. राममंदिर आंदोलनाच्या काळात ही मंडळी शिवसेनाप्रमुखांकडे यायची. त्यांच्याशी चर्चा व्हायची. लालकृष्ण आडवाणी यांनी राममंदिरासाठी रथयात्रा काढली होती. त्यांनाही आज नक्कीच आनंद झाला असेल असे सांगतानाच आडवाणी यांचीही आपण लवकरच भेट घेऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले. राममंदिराचा प्रश्न सुटला, पण काशी-मथुरेचा अद्याप बाकी आहे याबद्दलही पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर नुसते तोंडी हिंदुत्व मानणारे नाहीत तर हिंदुत्व आचरणात आणणाऱ्या पक्षांनी त्याचा निर्णय घ्यावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आनंद साजरा करा, पण कुणाच्या भावना दुखावू नका!
हिंदूंची श्रद्धा, भावनेला आज न्याय मिळाला. त्याचा आनंद जरूर व्यक्त करा पण शांतता राखा, कुठेही कुणाच्याही भावना दुखावतील असे वेडेवाकडे काही करू नका असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. एक अध्याय संपला असला तरी एक नवे पर्व सुरू होत आहे त्याचे सर्व हिंदुस्थानींनी मिळून स्वागत करूया, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अयोध्याप्रश्नी आलेल्या निकालाचा स्वीकार करताना सर्वधर्मीयांनी जसा समजूतदारपणा दाखवला तसा यापुढेही दाखवला तर हिंदुस्थान ही जगातील एक महाशक्ती बनेल असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. पूर्वीचा इतिहास उगाळत न बसता हातात हात घालून पुढे जाऊया, असे ते म्हणाले.
शिवनेरीच्या मातीने चमत्कार घडवला
‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा देत गेल्या वर्षी 24 नोव्हेंबरला केलेल्या अयोध्या दौऱ्याच्या आणि शरयू आरतीच्या आठवणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी ताज्या केल्या. शिवजन्मभूमिवरील मूठभर माती घेऊन आपण अयोध्येत गेलो होतो. ज्या मातीमध्ये छत्रपती शिवराय हे आपले दैवत जन्माला आले ती माती अयोध्येत घेऊन गेल्यानंतर नक्कीच चमत्कार घडेल असा आपल्याला विश्वास होता आणि आज वर्ष पूर्ण व्हायच्या आत चमत्कार घडला असे उद्धव ठाकरे म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पाहून आपण येत्या 24 नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येला जरूर जाऊ, असेही ते म्हणाले.
मंदिर वहीं बनेगा! अयोध्या प्रभू श्रीरामाचीच! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
याप्रसंगी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे, आनंदराव अडसूळ, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई व विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.
मी पुनः पुन्हा अयोध्येला जाईन
गेल्या एक वर्षात आपण दोन वेळा अयोध्येला गेलात याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ‘मी पुनः पुन्हा अयोध्येला जाईन. कारण त्या जागेत एक शक्ती आहे ती मला जाणवली. तिथे गेल्यानंतर आपण आपोआप नतमस्तक होतो’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
करसेवकांना मानाचा मुजरा
अयोध्या आंदोलनात सहभागी झालेल्या करसेवकांना यावेळी उद्धव ठाकरे यांनी मानाचा मुजरा केला. ‘अयोध्या हा विषय नव्हे तर एक लढा होता, एक आंदोलन होते. त्यात सहभागी झालेले काही करसेवक आजही आहेत. काही वयोमानापरत्वे आपल्यामध्ये नाहीत तर अनेक जण त्या आंदोलनात शहीद झाले. त्यांना मी मानाचा मुजरा करतो’, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
#AyodhaVerdict – न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत! वाचा दिग्गजांच्या प्रतिक्रिया
शिवसेनाप्रमुखांची आठवण
शिवसेनाप्रमुखांची आठवण काढतानाच उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, आपल्या देशात मी हिंदू आहे हे बोलायलाही लोक घाबरत होते त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या मनात हिंदुत्वाचा अंगार फुलवला होता. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा हिंदुत्वाचा नारा त्यांनी बुलंद केला होता अशी आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी करून दिली. अयोध्या खटला अनेक वर्षे सुरू होता, पण शिवसेनेने तो विषय ऐरणीवर आणून न्यायालयाकडून तोडगा निघत नसेल तर विशेष कायदा करून प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती. त्या मागणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य पक्षांनीही दुजोरा दिला होता, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
‘बाबरी’खाली मंदिराचे अवशेष शोधून काढले, के. के. मुहम्मद यांचे महत्त्वपूर्ण योगदान



























































