
सामना ऑनलाईन । फैजाबाद
अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सोमवारी, 29 ऑक्टोबरला सुनावणी सुरू होईल आणि या खटल्याची नियमित सुनावणी कशी करायची याचीही रूपरेषा त्याच दिवशी निश्चित केली जाईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजय किशन कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या तीनसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे.
रामजन्मभूमी प्रकरणी वादाची नियमित सुनावणी 29 ऑक्टोबरपासून करण्याचे आदेश निवृत्त होण्यापूर्वी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. अब्दुल एस. नजीर यांच्या पीठाने दिले होते. त्यानुसार सोमवारी या खटल्याची पहिली सुनावणी होणार असून खटल्याच्या पुढच्या तारखा त्याच दिवशी निश्चित केल्या जातील. 1994 साली सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालावर पुनर्विचाराची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा न्या. मिश्रा यांच्या पीठाने 2-1 अशा बहुमताने दिला होता.
summary- ayodhya hearing to start from today in supreme court






























































