
अयोध्या येथे राहणारे मोहम्मद शरीफ मागील 28 वर्षांपासून हजारो बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. 85 वर्षीय शरीफ यांच्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने 2019 साली ‘पद्मश्री’ सन्मान जाहीर केला. ही बातमी टीव्हीवरूनच शरीफ यांना कळली होती. त्याचा त्यांनी आनंद साजरा केला. मात्र अद्याप त्यांनी पद्मश्री सन्मान बहाल करण्यात आलेला नाही. प्रशासनाकडून कोरोनाचे कारण सांगितले जात आहे. मात्र मोहम्मद शरीफ यांची प्रकृती नाजूक आहे. पदकाच्या प्रतीक्षेत ते अखरेच्या घटका मोजत असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
मोहम्मद शरीफ हे शरीफ चाचा म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मुलाचा 28 वर्षांपूर्वी दुर्घटनेत मृत्यू झाला होता. बेवारस समजून त्यांच्या मुलावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले होते. तेव्हापासून शरीफ चाचांनी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. व्यक्ती कोणत्याही धर्माची असली तरी त्याच्या रितीरिवाजानुसार ते अंत्यसंस्कार करतात. याच कार्याने त्यांना‘पद्मश्री’पर्यंत पोचवलं.
सध्या शरीफ चाचा आजारी असून औषधोपचारालाही त्यांच्याकडे पैसे नाहीत. दोन खोल्या असलेल्या भाडय़ाच्या घरात ते राहतात. वर्षभरापूर्वी त्यांना पुणी ओळखतही नव्हते. आजारी असल्याने ते बेडवरच असतात. आतापर्यंत त्यांना ना पदक मिळाले, ना मानपत्र. पदकाची एक झलक बघता यावी म्हणून ते आसुसले आहेत.
औषधांसाठी पैसे नाहीत
शरीफ चाचा अयोध्येच्या मोहल्ला खिरकी अली बेग येथे राहतात. त्यांच्याकडे औषधोपचारासाठी पैसे नाही. ते यकृत आणि किडनीच्या आजाराने त्रस्त असून अंथरुणाला खिळून असतात. तब्येत चांगली होती, तेव्हा ते पत्र्याच्या शेडमध्ये सायकल दुरुस्तीचे दुकान चालवत होते. शरीफ यांच्या पत्नी बिब्वी म्हणाल्या, आमच्या डोक्यावर खूप कर्ज आहे. स्थानिक सावकार आणि औषध दुकानदारांचे खूप देणे आहे. कोरोनामुळे पद्मश्री सोहळा रद्द झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते.
– आम्हाला दिल्लीहून फोन आला होता की राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. माझ्या वडिलांनी 2500 रुपये उधारीवर घेऊन रेल्वेचे तिकिट बुक केले होते. शेवटच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही अजून तिकिटाचे पैसे परत करू शकलो नाही, असे शरीफ चाचा यांच्या मुलाने सांगितले.




























































