प्रभू श्रीरामासाठी कायपण… कारसेवेसाठी दिला सरकारी नोकरीचा राजीनामा

2255

>> सुनील उंबरे

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणाचा अंतिम निकाल शनिवारी सर्वोच्च न्यायलयाने दिला. अयोध्येतील ती जागा रामलल्लाचीच असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावेळी देशभरातील प्रभू श्रीराम भक्तांनी जल्लोष केला. नव्वदच्या दशकामध्ये रामजन्मभूमीचा लढा तीव्र झाला होता. त्या वेळच्या आठवणी प्रकाश उत्पात यांनी ताज्या केल्या.

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी कारसेवेत सहभागी होण्याची मनोमन इच्छा पण सरकारी नोकरीची अडचण होती. शेवटी नोकरीला लाथ मारुन कारसेवेत सहभागी झालो, हे सांगताना प्रकाश उत्पात यांना न्यायालयाच्या निर्णयानंतर अश्रू अनावर झाले. आपल्या जीवनाचे सार्थक झाले अशी भावना त्यांनी ‘दै. सामना’शी बोलताना व्यक्त केली.

मंदिर वहीं बनेगा! अयोध्या प्रभू श्रीरामाचीच! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

देशभर श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलन वारे सुरु होते. या आंदोलनात सहभागी व्हायचे अशी उत्पात यांची मनोमन इच्छा होती. पण शासकीय शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने आंदोलनात सहभाग घेतला आणि गुन्हा दाखल झाला तर नोकरी जाणार ही भीती कायम होती. परंतु श्रीरामासाठी कायपण अशी भूमिका घेत उत्पात यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आयोध्येचा रस्ता धरला. जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग डिंगरे यांच्या नेतृत्वाखाली 15 युवकांची फौज कारसेवेसाठी निघाली त्यात उत्पात, स्व. शंकरआप्पा मंगळवेढेकर हे आघाडीवर होते.

https://www.saamana.com/ayodhya-verdict-supreme-court-result-history-of-ayodhya-case/

ते पुढे सांगतात, मोठया उत्साहात आम्ही कारसेवेला निघालो. मात्र प्रयाग स्थानकावर आम्हाला अडवण्यात आले. पुढे गेलात तर अटक करण्यात येईल, प्रसंगी गोळ्याही घातल्या जातील अशा धमक्या पोलीस देत होते. त्यामुळे आमच्या सोबत असलेल्या जेष्ठ मंडळींनी प्रयाग येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र मला काही स्वस्थ बसवेना. आपण कारसेवेला आलो आहोत. कसल्याची परिस्थितीत आयोध्येला पोहोचायचेच हे ठाम ठरवून मी व काही मंडळी पुढे जायला निघालो. मिळेल त्या वाहनाने आम्ही पुढे जात होतो. वाटेत पोलीस व प्रशासनाने कारसेवक आयोध्येत पोहोचू नयेत म्हणून अनेक अडथळे निर्माण केले होते. मात्र आम्ही पायवाटेने, प्रसंगी बैलगाडीत, ट्रक्टरमध्ये बसून पुढे जात राहिलो. अखेर आम्ही 5 डिसेंबर रोजी आयोध्येत पोहोचलो.

अयोध्येत लाखोंच्या संख्येने कारसेवक आयोध्येत जमले होते. कारसेवकांत प्रचंड उत्साह व उर्जा होती. कसल्याही स्थितीत रामजन्मभूमी मुक्त झालीच पाहिजे यासाठी युवक काहीही करण्यास तयार होते. आम्ही प्रचंड गर्दीत पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याठिकाणी गोळीबार झाला. आम्ही थोडक्यात बचावलो. आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले व पुन्हा माघारी आणून सादीपूर येथील कारागृहात बंद करण्यात आले. आमच्या सोबत देशभरातून आलेले अनेक स्वयंसेवक होते. मात्र बाबरी मशिदीचा विवादित ढाचा कारसेवकांनी उद्ध्वस्त केल्याचे समजल्यानंतर आम्हाला प्रचंड आनंद झाला. सात दिवस तेथील कारागृहात ठेवल्यानंतर आमची सुटका झाली.

आपली प्रतिक्रिया द्या