
भोंग्याच्या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे दोघे एकत्र बसून दोन दिवसात राज्यासाठी एकत्रित असं धोरण ठरवतील. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी एक नोटिफिकेशन काढले जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल यांनी दिली.
राज्यात सध्या भोंग्यांचे राजकारण सुरू असून राजकीय वातावरण तापले आहे. गृहमंत्र्यांना पत्रकारांनी यावेळी अमरावती वैगरे भागात झालेल्या घटनांविषयीही विचारणा केली. तेव्हा ‘परिस्थिती नियंत्रणात असून स्थानिक पोलीस योग्य तो निर्णय घेतील’, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करू नये. तसा प्रयत्न कुणी केल्यास आणि त्यात दोषी आढळल्यास तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. मग ती व्यक्ती असो, संघटना असो किंवा आणखी कुणीही असो, असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
























































