‘नमाज पढा, मग तुम्हाला जे हवं ते करा, हेच मुस्लिमांना शिकवले जाते’, रामदेव बाबांचे विधान चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका धार्मिक सभेला संबोधित करताना योगगुरू बाबा रामदेव यांनी इस्लाम आणि मुस्लिमांवर केलेल्या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. या सभेत ते म्हणाले की, ‘इस्लाम धर्माचा अर्थ फक्त नमाज अदा करणे आहे. मुस्लिमांसाठी फक्त नमाज अदा करणे आवश्यक आहे. नमाज अदा केल्यानंतर तुम्ही तुम्हाला जे हवं ते करू शकता. हिंदू मुलींना उचलून आणा किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी व्हा, तुमच्या मनात येईल ते करा’. बाडमेरमधील एका गावातील ब्रह्मलीन तपस्वी संत धर्मपुरी महाराज यांच्या मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ख्रिश्चन धर्मावर निशाणा साधत रामदेव म्हणाले की, ‘दिवसा चर्चमध्ये जा आणि मेणबत्ती लावा, सर्व पापे धुतली जातील, असे ख्रिश्चनांमध्ये केले जाते. परंतु हिंदू धर्मात असे काहीही होत नाही.

यावेळी ते म्हणाले की, ‘मुस्लिमांसाठी जन्नत म्हणजे घोट्याच्या वर पायजमा घालणे, मिशा कापणे आणि टोपी घालणे. हे मी म्हणत नसून ती लोकं हे करत आहेत. मग ते म्हणतात की स्वर्गात त्यांचे स्थान निश्चित झाले आहे. तिकडे हुर मिळतील आणि दारू प्यायला मिळेल. असा स्वर्ग नरकापेक्षाही वाईट, तरीही ते लोक मिशा कापतात आणि टोप्या घालतात. हा वेडेपणा आहे. संपूर्ण समाजाला इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल या द्विधा मनस्थितीत ते लोक आहेत’.

यावेळी रामदेव म्हणाले की, “मी कोणावरही टीका करत नाही, पण ते लोक त्याच द्विधा मन:स्थितीत आहेत. काहीजण म्हणतात की ते संपूर्ण जगाला इस्लाममध्ये धर्मांतरित करतील, तर काही म्हणतात की ते संपूर्ण जगाला ख्रिश्चन बनवतील. परंतु त्यांच्याकडे समाजात परिवर्तन करण्याचा कोणताही अजेंडा नाही.”

सनातन धर्मात असे नाही, देवाचे स्मरण करा. योग, ध्यान आणि सेवा करा. हा सनातन धर्म आहे. देवाने केवळ मानव जातीची निर्मिती केली. बाकीच्या जाती आपण सर्वांनीच निर्माण केल्या आहेत. हिंदू धर्म अनेक जातींमध्ये विभागला गेला आहे. त्यामुळे तुमच्या धर्माविषयी जागरुक राहा आणि धर्मगुरूंच्या आवाहनासाठी नेहमी तयार राहा. धर्मगुरू तुम्हाला जेथे सांगतील तेथे उभे रहा. असे रामदेव म्हणाले.