
एनसीईआरटी अभ्याक्रमाच्या नवीन समाजशास्त्र पुस्तकात बाबरचा उल्लेख क्रूर आणि निर्दयी विजेता असे करण्यात आले आहे. तर अकबरच्या कारकिर्द ही क्रौर्य आणि सहिष्णुतेचा मिश्रण होती असे म्हटले आहे. दुसरीकडे औरंगजेबाने त्याच्या कार्यकाळात मंदिरं आणि गुरुद्वारे पाडली असा उल्लेख करण्यात आला आहे. या काळात अनेक वेळा धार्मिक असहिष्णुतेचे प्रसंग घडल्याचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे. असे असले तरी भूतकाळासाठी आज कोणालाही जबाबदार धरू नये असे स्पष्टीकरण एनसीईआरटीने दिले आहे.
इयत्ता आठवीसाठी एक्सप्लोरिंग सोसायटी- इंडिया अँड बियाँड या पुस्तकाच्या पहिल्या भागाचे या आठवड्यात शैक्षणिक सत्रासाठी प्रसिद्ध करण्यात आले. या पुस्तकात दिल्ली सल्तनत, मोगल साम्राज्य आणि मराठ्यांचा इतिहास एकत्र दिला गेला आहे. हा इतिहास आधी इयत्ता सातवीत शिकवला जात होता.
पुस्तकातल्या रिशेपिंग इंडियाज पॉलिटिकल मॅप या धड्यात 13 व्या ते 17 व्या शतकापर्यंतच्या भारतीय इतिहासाचे चित्रण आहे. यामध्ये दिल्ली सल्तनतचा उदय आणि पतन, त्याला झालेला विरोध, विजयनगर साम्राज्य, मुघल साम्राज्य व त्यावरील विरोध, तसेच शीख संप्रदायाचा उदय यांचा समावेश आहे.
या पुस्तकात सल्तनत आणि मोगल काळात झालेल्या मंदिरांवरील हल्ल्यांचा, शिक्षणसंस्थांच्या नाशाचा, तसेच अनेक राजांच्या क्रूरतेचा उल्लेख आहे. सातवीच्या पुस्तकात हा इतिहास शिकवला जात होता तेव्हा या माहितीचा समावेश तेव्हा नव्हता. म्हणजेच नव्या पुस्तकात ही माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. एनसीईआरटीच्या नव्या पुस्तकात इतिहासातील क्रूर आणि असहिष्णु घटनांचा स्पष्ट उल्लेख केला आहे, मात्र विद्यार्थ्यांना भूतकाळाच्या घटनांकडे समतोल दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन एनसीईआरटीने केले आहे.