डॉ. आंबेडकर, फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांची बदनामी भोवणार, भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांविरुद्ध कार्यवाही करण्यास न्यायालयाची मुभा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. महापुरुषांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सीआरपीसी 200 अंतर्गत तक्रारदाराला कार्यवाही करण्यास मुंबई सत्र न्यायालयाने मुभा दिली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील व अन्य काहीजणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे 9 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा काढल्या त्यावेळी सरकारने त्यांना अनुदान नाही दिले, तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे अवमानकारक वक्तव्य केले होते. याप्रकरणी ऍड. विनोद सातपुते यांनी एससीएसटी कायद्याअंतर्गत खासगी तक्रार दाखल केली. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शरयू सहारे यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली तक्रारदाराने सीआरपीसीच्या कलम 156(3) अंतर्गत अर्ज केला; मात्र सीआरपीसीच्या कलम 154 चे पालन केले नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने तक्रारदाराची मागणी नामंजूर केली; मात्र तक्रारदाराला सीआरपीसीच्या कलम 200 अंतर्गत कार्यवाही करण्याची मुभा दिली.