‘वंदे मातरम्’ला आंबेडकरांचाही विरोध!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

‘मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीन’बरोबर मैत्री करून भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे विचारही हिरवे झाले आहेत. राष्ट्रगीत असताना वंदे मातरम् कशाला, असा उफराटा सवाल करत त्यांनी ‘एमआयएम’प्रमाणेच वंदे मातरम् म्हणण्याला विरोध असल्याचे सांगितले.

परभणी येथे आज मातंग समाज सत्ता संपादन परिषदेच्या वतीने आयोजित जाहीर सभेत अॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. राष्ट्रगीत म्हणणारे सर्वजण देशभक्त आहेत. त्यामुळे वंदे मातरम्ची सक्ती होणार असेल तर ती आम्हाला मान्य नाही, मुळात वंदे मातरम्लाच आमचा विरोध आहे असे ते म्हणाले.

काँग्रेससाठी वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे उघडे आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही कदापि युती करणार नाहीत, असेही आंबेडकर यांनी यावेळी पुन्हा स्पष्ट केले.  वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचेही ते म्हणाले.

z काँग्रेस सोबत आली काय किंवा नाही आली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. एमआयएमशी असलेली मैत्री आम्ही तोडणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.