मतांपुरता वापर करतात…बदला घेणार; बच्चू कडूंचे महायुतीला आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महायुतीसमोर दिवसेंदिवस नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. आता प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनीही महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. आमचा फक्त मतांसाठी वापर करतात असा आरोप करतानाच त्याचा बदला घेणार, वेळ पडल्यास प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभा करणार, असा इशारा कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आज अमरावती येथे बोलावली होती. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, मुंबईसह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही बैठका घेतल्या जाणार आहेत. आजच्या बैठकीपूर्वी बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीला गंभीर इशारा दिला.

महायुतीत आपल्याला केवळ मतांपुरते गृहीत धरले जात असून जागावाटपाच्या बाबतीत काहीच विचारणा केली जात नसल्याने त्याचा बदला घेतला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असे ते म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळत नसेल तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, वेळ पडल्यास महायुतीमधून बाहेर पडू आणि प्रत्येक मतदारसंघात आमचा उमेदवार उभा करू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.