
सामना प्रतिनिधी । पंढरपूर
वारकरी सांप्रदायाचा भगवान श्रीराम हा प्राण आहे, अनेक वर्षे श्रीरामाच्या जन्मभुमीतच रामाचे मंदिर होत नाही, अजून किती वर्षे वाट पहायची. आता राममंदिरासाठी सर्व हिंदुंनी एकत्रीतपणे लढा देणे आवश्यक असून सर्व वारकरी सांप्रदाय मंदिर उभारणीच्या कार्यात सक्रीय सहभागी होणार असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. बद्रीनाथमहाराज तनपूरे यांनी पंढरीत शिवर्तीर्थावर झालेल्या विराट धर्मसभेत बोलताना केले. या धर्मसभेस विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री ॲड.दिपक गायकवाड, ह.भ.प. ज्ञानेश्वरमहाराज जाशगदंड, वा.ना.उत्तात, ज्ञानेश्वरमहाराज जळगावकर, रामेश्वरमहाराज वीर, अनिल बडवे, बाबुराव महाराज वाघ, अनुराधाताई शेटे, अॅड माधव मिरासदार यासह अनेक धर्माचार्य व संत उपस्थित होते.
आपल्या अभ्यासपुर्ण घणाघाती भाषणात अॅड़ दिपक गायकवाड यांनी रामजन्मभुमीचा इतिहास सांगितला, ते म्हणाले हा केवळ मंदिराचा व दगड विटांचा प्रश्न नाही करोडो हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. रामजन्मभुमीसाठी शेकडो वर्षात 27 लढाया झाल्या परकीय इस्लामी आक्रमकांनी देशातील हिंदुंची श्रध्दास्थाने भ्रष्ट केली त्यामध्ये हजारो मंदिरांचा विध्वंस करण्यात आला. रामंदिराची लढाई स्वातंत्र्यानंतर गेले 50 वर्षे न्यायालयात चालु आहे. खोदकामात सापडलेल्या अनेक पुराव्या नंतर लखनौ उच्च न्यायालयाने या ठिकाणी मंदिरच असल्याचा एकमुखी निकाल दिल्यानंतर काँग्रेसच्या सिध्दार्थ शंकर राय यांनी काही मुठभर मुस्लीमांच्या वतीने या निकालास न्यायालयात आव्हान दिले व त्यामुळेच आजपर्यत ही लढाई न्यायालयात चालु आहे. ही लढाई परकीय आक्रमकांविरुध्द राष्ट्रीय अस्मितेची आहे. याचा निवडणुकीशी काहीही सबंध नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज असते तर त्यांनी रामंमंदिर निर्माण करण्यास पाठिंबा दिला असता असेही ते म्हणाले.
या सभेस मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.वारंवार जय श्रीराम,मंदिर वही बनायेंगेच्या घोषणा दिल्या जात होत्या भगवे झेंडे, पताका व श्रीरामाच्या भव्या प्रतिमेमुळे सारा परिसर राममय झाला होता.
भाजप सत्तेत येणार नाही
भागवताचार्य वा. ना. उत्पात बोलताना म्हणाले देशात व उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार असनाताही रामंदिराची उभारणी झाली नाही तर चार राज्यात ज्या प्रमाणे भाजपाचा पराभव झाला त्याच प्रमाणे साऱ्या देशात पुन्हा भाजपा निवडून येणार नाही.



























































