बंदी आदेश झुगारून वाईत बगाड यात्रा; हजारो भाविक,गावकऱयांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने यात्रा-जत्रांवर निर्बंधासह जमावबंदीचे आदेश जारी केले असताना वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा झाली. हजारो भाविक, गावकऱयांची गर्दी यावेळी उसळली होती. या गर्दीचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करीत यात्रा कमिटीच्या सदस्यांसह अनेकांची धरपकड सुरू केली आहे.

बावधनची बगाड यात्रेला साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी उत्साहात यात्रा होते; परंतु सातारा जिह्यात कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. जिह्यात रोज 700 वर रुग्ण आढळत आहेत. यामुळे यावर्षी गर्दी टाळण्यासाठी यात्रा-जत्रांवर बंदी घातली आणि जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. बावधनबरोबरच फुलेनगर गावची काळेश्वरी देवीची यात्राही रद्द करण्यात आली. प्रशासनाने बावधनसह परिसरातील 11 गावांमध्ये 27 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले होते.

कायदेशीर कडक कारवाई करणार – अप्पर जिल्हा अधीक्षक

बगाड यात्रेसाठी जिल्हाधिकाऱयांनी 144 कलम लागू केले असताना एवढय़ा मोठय़ा प्रामाणात ग्रामस्थांनी एकत्र येवून कोरोना संसर्गाला निमंत्रण दिले आहे. प्रशासना बरोबर अनेक वेळा सल्लामसलत करूनही दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे अप्पर जिल्हा अधीक्षक धिरज पाटील यांनी सांगितले.

कायद्याचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई होईल – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या कराव्यात अशा सचूना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या. शासनाने व प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मास्क घालणार नाहीत अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. तसेच रात्री 8 नंतर 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत याचीही दक्षता पोलिसांनी घ्यावी, असे ते म्हणाले. दरम्यान बावधन येथील बगाड यात्रेसाठी पुढाकार घेणाऱयांना प्रशासनाने नोटीसा दिल्या होत्या. ज्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कारवाई होईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

अनेकांवर पोलीस कारवाई

बंदी आदेश झुगारून बगाड यात्रा काढणाऱया यात्रा समिती सदस्य आणि अनेक गावकऱयांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. अनेकजणांना ताब्यात घेतले आहे. फोटो आणि व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे धरपकड केली जात आहे.