
उत्तर प्रदेशातील बागपतमधल्या बडौत भागातील एक व्हिडीओ सध्या भलताच व्हायरल झाला आहे. ‘चाट’ विक्री करणाऱ्या दुकानदारांमध्ये वाद झाला होता आणि या वादाचं पर्यावसन हाणामारीमध्ये झाले. दांडके, सळया, काठ्या घेऊन दोन्ही गटांत ही हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते प्रख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांच्यासारखी हेअरस्टाईल असलेल्या व्यक्तीने. हिरव्या रंगाचा कुर्ता, पांढरी सलवार आणि स्वेटर घातलेली ही व्यक्ती जमिनीवर पडली तरी लोळत लोळत प्रतिस्पर्ध्याला चोपताना दिसतेय. ही व्यक्ती एकदा नाही तर दोनवेळा पडली. दोन्ही वेळा या व्यक्तीने झोपून प्रतिस्पर्ध्याला मारणं चालूच ठेवलं होतं. या व्यक्तीचं नाव हरेंद्र असल्याचं कळालं आहे.
उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये ‘चाट’चे दुकान चालवणाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये आईनस्टाईनसारखी हेअरस्टाईल असणारी व्यक्ती जमिनीवर लोळत लोळत प्रतिस्पर्ध्यांना चोपताना दिसते आहे. ही व्यक्ती या हाणामारीमुळे फेमस झाली आहे. #Baghpat #Fights pic.twitter.com/vKq1K02CcP
— Saamana (@SaamanaOnline) February 23, 2021
वादाला कुठे तोंड फुटलं?
बडौत भागामध्ये ‘चाट’ची दुकाने आहेत. हरेंद्र यांचंही या भागात दुकान असून ते जवळपास 40-50 वर्ष जुनं आहे. त्यांच्या शेजारी दोन-तीन महिन्यांपूर्वी आणखी एका दुकानदाराने ठेला लावला होता. हा नवा चाटवाला हरेंद्र यांच्याकडची गिऱ्हाईकं पळवत होता. हरेंद्र यांच्याकडचा माल हा रात्रीचा असून आमच्याकडचा माल ताजा असतो असं नवा दुकानदार गिऱ्हाईकांना सांगत होता. हरेंद्र यांनी सोमवारी नव्या दुकानदाराला जाब विचारला होता. यातून दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली आणि बघताबघता भांडणाचं रुपांतर मारामारीमध्ये झालं. या व्हिडीओवरून हरेंद्र हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर भारी पडल्याचं दिसून येत आहे. या मारामारीनंतर पोलिसांनी एकूण 10 लोकांना अटक केली असून त्यामध्ये हरेंद्र यांचाही समावेश आहे.
मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हरेंद्र यांच्यावरून मीम्स बनायला सुरुवात झाली आहे. काहींनी हरेंद्र यांना हिरो म्हटलंय तर काहींनी त्यांची तुलना अल्बर्ट आईनस्टाईन यांच्याशी करत खसखस पिकवत आहेत. हरेंद्र यांना हाणामारीनंतर त्यांच्या हेअरस्टाईलबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की ते साईबाबांचे भक्त आहेत. दोन वर्षातून ते एकदाच केस कापतात आणि कापलेले केस ते हरिद्वार इथे अर्पण करतात.