
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक महापौर बंगल्याच्या जागेवर साकारणार आहे. महापौर बंगल्याच्या पुरातन वास्तूला कोणताही धक्का न लावता 22 हजार चौरस फुटांमध्ये दोन मीटर जमिनीखाली हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे. म्युझियम, चित्रकारांसाठी दालन, बाळासाहेबांची व्यंगचित्रे, बाळासाहेबांच्या वस्तूंचे दालन अशा स्वरूपात साकारणाऱया या स्मारकाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी पुरातत्व, पर्यावरण, अग्निशमन दल अशा सर्व प्रकारच्या परवानग्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्मारकाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती स्मारकाचे आर्किटेक्ट अनिल पाटील यांनी दिली. जमिनीखाली 22 हजार चौरस फुटांमध्ये हे स्मारक साकारण्यात येणार आहे. समुद्राच्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन स्मारकासाठी दोन संरक्षक भिंती बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीगळतीचा धोका राहणार नाही. स्मारकाचे फ्लोअरिंग करताना त्याखालीही डबल स्लॅब केले जाणार आहेत. यामुळे कितीही पाणी आले तरी त्याचा धक्का स्मारकाला पोहोचणार नाही, असे पाटील म्हणाले.
- 22 हजार चौरस फुटांत जमिनीखाली साकारणाऱया या स्मारकाचा प्रवेशही समोरून दोन जिन्यांनी होणार असून दर्शनी भागात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा साकारण्यात येणार आहे.
- शिवसेनाप्रमुखांची व्यंगचित्रे, त्यांनी वापरलेल्या वस्तू यांचे म्युझियम या ठिकाणी साकारण्यात येणार आहे.
- चित्रकारांना आपली चित्रे साकारण्यासाठी महापौर बंगल्याच्या आवारात दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- नवीन पिढीलाही शिवसेनाप्रमुखांचा आवाज, त्यांची भाषणे तसेच संभाषण प्रत्यक्षात अनुभवता यावे यासाठी थ्रीडी इमेजिंगच्या साहाय्याने शिवसेनाप्रमुख प्रत्यक्षात त्यांच्यासमोर दिसणार आहेत.






















































