विलासकाका, पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येणे ही परिवर्तनाची नांदी – बाळासाहेब थोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले विलासकाका पाटील-उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही गटांचे मनोमिलन हे राजकीय परिवर्तनाची नांदी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये या दोघांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू राहणार असून उदयसिंह पाटील यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी देणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

पृथ्वीराज चव्हाण आणि माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे पुत्र जि‌ प‌. सदस्य व रयत साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, विलासकाकांची काम करण्याची पद्धत कडक आहे. उदयसिंह पाटील यांच्या विचारात यशवंतरावांचे विचार दिसतात. विरोधकांवर रामबाण उपाय करायचा असेल तर तो पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णयांमधून शिकले पाहिजे. चव्हाण व पाटील घराणे 50 वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. दोघांनाही काँग्रेस विचारधारा आहे. जिल्ह्यामध्ये काँग्रेसला बळकटी मिळणार असून उदयसिंह पाटील काँग्रेसमध्ये राज्यस्तरीय संधी देण्यात येणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

पृथ्वीराजबाबा चव्हाण म्हणाले, कराड दक्षिणमध्ये आम्ही समोरासमोर लढल्यामुळे काँग्रेसची ताकद विभागली. आमचे वैचारिक मतभेद होते. वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आलो नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका यांची तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी गेलो, त्यावेळेस काकांनी मला शब्द दिला. माझ्या घरातील कोणीही भाजप या जातिवादी पक्षांमध्ये प्रवेश करणार नाही. विलासकाका पाटील म्हणाले, देशाला कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही. नेहरू कुटुंबाचा द्वेष करणे हे भाजपचे काम आहे. काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी सर्वांनी संयुक्त प्रयत्न केला पाहिजे. आपल्या घरामध्ये काँग्रेसची चळवळ आहे. मी काँग्रेसमध्ये होतो, आहे, व काँग्रेसमध्ये राहणार, असे ते म्हणाले.

राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, काकांची सातारा जिल्ह्यामध्ये पकड होती. सर्वसामान्यांचा फायदा कसा होईल, याचा काकांनी नेहमी विचार केला. काँग्रेस पक्षाने तरुण कार्यकर्त्यांना ताकद द्यावी. जिल्ह्यामध्ये कॉंग्रेस बळकट होईल असा विश्वास राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. उदयसिंह पाटील म्हणाले, काका – बाबांमध्ये वैचारिक मतभेद होते. आता एकत्र आलो आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शासनाची ताकद तरुण कार्यकर्त्यांच्या मागे उभी करावी. कार्यकर्त्यांनी गटतट विसरून काम करणे गरजेचे आहे.