आकडे लपविणाऱया राज्यांमध्ये मृतदेह गंगाकिनारी साचले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी व पारदर्शक काम करताना सत्य आकडेवारी सांगितली आहे. याउलट ज्यांनी आकडेवारी लपविली, त्या राज्यांमधील मृतदेह गंगाकिनारी साचल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, शिवाजी थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे, लक्ष्मण कुटे, शंकर खेमनर, अमित पंडित, आर. बी. रहाणे, अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, गणपतराव सांगळे, रामदास वाघ, विष्णुपंत रहाटळ, साहेबराव गडाख, दत्तू खुळे, सुरेश झावरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत प्रभावी उपाययोजना करत काम केले आहे. या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे. कोरोनाचे संकट अद्यापि संपलेले नसून, कोणीही हलगर्जीपणा करू नका. कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. टास्क फोर्सच्या मते तिसरी लाट येण्याचा मोठा धोका आहे. यामध्ये राज्यात 50 लाख रुग्ण असू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

दुसऱया लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडय़ामुळे राज्य सरकारने तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजननिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून, यामध्ये राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. साखर कारखान्यांमधून ऑक्सिजननिर्मिती करणारा थोरात कारखाना तिसरा ठरला आहे. कारखान्याने मागील कोरोना लाटेमध्ये 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले होते. या ऑक्सिजननिर्मिती प्लांटमधून दररोज 850 किलो ऑक्सिजन निर्माण होणार असून, 100 रुग्णांना पुरेल इतका हा ऑक्सिजन आहे, असेही ते म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेक तरुण मृत्यू पावले. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागला. तिसऱया लाटेचा मोठा धोका असलेल्या प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याने मदतीच्या भावनेतून काम केले असून, हवेतून ऑक्सिजननिर्मितीच्या या प्रकल्पामुळे 100 रुग्णांचा दिलासा दररोज मिळणार आहे. आगामी काळात मोठय़ा खासगी हॉस्पिटलनेही स्वतःचे ऑक्सिजन प्लांट निर्माण करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.