
सामना ऑनलाईन । मुंबई
नॅशनल लायब्ररी- वांद्रे आणि ज्योती फाऊंडेशनचा मुलं मोबाईलपासून दूर राहावीत, त्यांचा विकास व्हावा, त्यांना जगण्याचा आत्मविश्वास यावा, त्यांचे सुप्तगुण बहरास यावेत यासाठीचा असलेला सुट्टीचा बालकट्टा पार पडला.
एकूण सात दिवसाच्या या उपक्रमात डॉ.मधुमंजिरी गटणे यांनी मुलांना नवरसाचा उपयोग करून कथा कशी सादर करावी हे सांगितले. निरंजना शहा यांनी मुलांकडून ओरिगामीचा मासा आणि ह्रदय तयार करून घेतळे आणि ओरिगामी मुळे मुलांचे मन एकाग्र होण्यास मदत होते हे सांगितलं. तर नेपथ्यकार संतोष जढाळ यांनी मुलांना नाटकाचे तंत्र आणि मंत्र समजावून सांगून मुलांना नाटकाची ओळख करून दिली तर नवोदित अभिनेत्री, सूत्रसंचालक, पत्रकार ज्ञानेश्वरी वेलणकर हिने बालकट्टाच्या मुलांसाठी ‘नौटंकी’ हे सेशन घेऊन प्रत्येक मुलाच्या अभिव्यक्तीला वाव दिला, त्यांना बोलतं केलं, मेडीटेशन तसेच ओंकाराचे महत्व समजावून सांगितले, त्यांच्याबरोबर अतिशय कल्पकतेने खेळ खेळून त्यांना नाटक कसं करायचे हे सांगितलं. नंतर मुलांना लहानपणापासूनच बचत, सेव्हिंगचे महत्व समजावून द्यायला हवं. त्यामुळे मुलांना एक चांगली सवय लागते. जी आयुष्यभर त्यांच्या उपयोगी पडते. त्याच उद्देशाने बांद्रा वेस्टच्या अभ्युदय बँकेत मुलांना घेऊन जाऊन बँकेचे कामकाज कसे चालते, बचत म्हणजे काय, ती का करायची? बचतीवर कसं व्याज मिळतं हे समजावून सांगितलं. त्यांचे बँकेत अकाउंट ओपन करून बँक मॅनेजर यांनी त्यांना पासबुक आणि कॅडबरी दिल्या. तसेच कराटेच्या ब्लॅक बेल्ट असलेल्या रेणुका पांचाळ यांनी मुलांना व्यायामाचे, योगाचे, खेळाचे महत्व समजावून सांगून या सवयीमुळे आपल्याला कसे सकारात्मक आयुष्य जगता येते,सर्वांगीण प्रगती होते हे सांगितले. तर लिटिल शेफ मध्ये शेफ तुषार प्रीती देशमुख यांनी मुलांना आवडते सँडविच, कॉर्न भेळ शिकवली आणि गट करून मुलांकडून मेथीची भाजी निवडणे, काळी पिवळी डाळ वेगळी करणे यासारखे कल्पक गेममधून किचनमध्ये काम करतांना कशी काळजी घ्यावी आणि गट करण्याचे फायदे पटवून दिले.
शेवटच्या दिवशी असलेलं स्नेहसंमेलनात मुलांच्या कार्यक्रमाचे आर्यन आणि आयुध यांनी उत्स्फूर्तपणे निवेदन केले आणि बालकट्ट्याचा हेतू सफल झाला असं ज्योती फाऊंडेशनच्या ज्योती कपिले म्हणाल्या. तर नॅशनल लायब्ररीचे प्रमोद महाडिक यांनी सुट्टीत मुलांसाठी दररोज लायब्ररीत दुपारी 1 ते 4 दरम्यान मोफत गोष्टींची पुस्तकं वाचण्याची मुभा असल्याचीही माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलतांना डॉ. मधुमंजिरी गटणे यांनी बालकट्टा या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि नॅशनल लायब्ररी व ज्योती फाऊंडेशन या दोन्ही संस्था मिळून एक मोठे समाजकार्य करत आहेत आणि या उपक्रमाला माझे निरपेक्ष सहकार्य लाभेल असे त्यांनी आवर्जून सांगितले. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील धोत्रे, अनिल जोशी, धनश्री व्यवहारे, नितीन, मनीष, गावडे काका आणि सुशील आदींनी मेहनत घेतली.


























































