
पालीचा बल्लाळेश्वर हा गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या विविध भागांतून लाखो गणेशभक्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराचा प्राचीन इतिहास संशोधक, पौराणिक माहिती तसेच पुरावेदेखील पुस्तकात दिले असून अभ्यासकांसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अष्टविनायकाचा महिमा सातासमुद्रापल्याड पसरला असून बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागते. मात्र हा बल्लाळेश्वर म्हणजे नेमका कोण, त्याची स्थापना कोणी केली, मंदिर बांधण्यासाठी किती खर्च आला, घडलेल्या ऐतिहासिक घडामोडी याची अनमोल माहिती लेखक संदीप परब यांनी संकलित केली आहे. चित्रा गंध पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून स्थापत्य शास्त्राचे दाखले संदर्भासहित दिल आहेत.
दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश
या पुस्तकात दुर्मिळ छायचित्र असून श्रीमंत मोरोपंत फडणवीस यांची पेशवाईतील कारकीर्द, पोर्तुगीज घंटा यांची पुराव्यासह माहिती लेखकाने दिली आहे. अभ्यासक, इतिहास संशोधक व गणेश भक्तांसाठी हे पुस्तक म्हणजे पर्वनीच ठरेल, असा विश्वास संदीप परब यांनी व्यक्त केली आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. धनंजय धारप, विश्वस्थ सचिन साठे, उपेंद्र कानडे, राहुल मराठे, तहसीलदार दिलीप रायन्नवार आदी उपस्थित होते.



























































