
सामना ऑनलाईन । वाराणसी
प्रभू श्रीरामचंद्राचे नाव घेऊन सत्तेवर आलेले आलिशान बंगल्यामध्ये राहत आहेत आणि रामलल्ला मात्र तंबूत! हे चित्र अतिशय संतापजनक आहे. मोदीजी, जोपर्यंत रामलल्ला तंबूत आहेत तोपर्यंत तुम्हीही बंगल्यात नाहीतर तंबूत राहा, असे ठणकावत बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टाने चक्क तंबू पाठवला. यापुढे भाजपच्या प्रत्येक खासदार, आमदाराला आम्ही तंबू पाठवणार असल्याचेही या विद्यार्थ्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत अयोध्येतील राम मंदिराच्या संदर्भात सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघेल, मात्र मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही अशी आडमुठी भूमिका घेतली. ज्यांनी रामनामाचा जप करत सत्ता मिळवली त्यांनीच अशी पळपुटी भूमिका घेतल्याने समस्त हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या बनारस हिंदू विद्यापीठातही या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटले. विद्यार्थ्यांच्या एका गटाने ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनायेंगे’ अशी बुलंद घोषणाबाजी करत विद्यापीठातील टपाल कार्यालय गाठले. या विद्यार्थ्यांनी पैसे गोळा करून एक तंबू आणला आणि 68 रुपये खर्च करून स्पीड पोस्टाने तो पंतप्रधान कार्यालयाला पाठवला.
यासंदर्भात बोलताना विद्यार्थ्यांनी मोदी सरकारवर प्रचंड आगपाखड केली. राममंदिरासाठी हिंदूंनी आता किती वाट बघायची? न्यायालयीन प्रक्रियेवर आता विश्वासच उरला नाही असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी वाट बघण्याची भाषा केली आहे, परंतु आता वाट बघणे शक्य नाही. त्यामुळेच आम्ही पंतप्रधानांना तंबू पाठवला आहे. यापुढे प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांना, मुख्यमंत्र्यांना तसेच भाजपच्या खासदार, आमदारांना आम्ही तंबू पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
























































