
बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता तिथे एका हिंदू तरुणाची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना राजबारी जिल्ह्यातील सदर उपजिल्हामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव आणि संताप निर्माण झाला. मृत व्यक्तीची ओळख ३० वर्षीय रिपन साहा अशी झाली आहे. तो राजबारीतील गोलंडा मोर जवळील करीम फिलिंग स्टेशनवर काम करत होता. एका ड्रायव्हरने पेट्रोल पंपावर इंधन भरले होते, परंतु ड्रायव्हरने पैसे देण्यास नकार दिल्याने रिपन साहाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी, आरोपी ड्रायव्हरने जाणूनबुजून रिपनला गाडीखाली चिरडत त्याची हत्या केली आहे.
पोलिसांनी घटनेची पुष्टी करत वाहन जप्त केले आहे. तसेच वाहनचालक अबुल हाशेम याला अटक करण्यात आली आहे. हाशेम हा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या राजबारी जिल्हा युनिटचा माजी कोषाध्यक्ष असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी बनीभान निपारा गावातील चालक कमाल हुसेन यालाही ताब्यात घेतले. राजबारी सदर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी खोंडकर झियाउर रहमान यांनी सांगितले की हा अपघात नाही तर खुनाचा गुन्हा आहे. त्यांनी सांगितले की आरोपीने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा पीडित वाहनासमोर उभा होता, वाहनाने त्याला गाडीखाली चिरडले आणि घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
बांगलादेशात हिंदू समुदायावर हिंसाचाराच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या आठवड्यात फेनी जिल्ह्यातील दागनभुईयान उपजिल्हा येथे समीर दास या आणखी एका हिंदू तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह शेतातून सापडला. ९ जानेवारी रोजी हिंदुस्थानने बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्याकांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.


























































