बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला 65 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाल्यानंतरही सोशल मीडियावर वाद-विवाद सुरू झाला आहे. 10 वर्षाचा अनुभव असूनही फक्त 65 लाखांचे पॅकेज मिळत असेल तर टेक सेक्टरमधील अच्छे दिन संपले आहेत, यासारख्या कमेंट युजर्सनी केल्या आहेत.
जेपी मोर्गनमध्ये डेव्हलपर म्हणून कार्यरत असलेल्या कार्तिक जोलपारा या तरुणाने सोशल मीडियावर या पॅकेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करताना कार्तिकने म्हटले की, पाहा, दहा वर्षांचा अनुभव. तुम्हाला काय काय देऊ शकतो.
खरं म्हणजे ही ऑफर गुगलकडून एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला मिळाली आहे. या ऑफरमध्ये 65 लाख रुपयांची बेस सॅलरी, 9 लाख रुपयांचे वार्षिक बोनस, 19 लाख रुपयांचे सायनिंग बोनस, 5 लाख रुपयांचे रिलोकेशन बोनसचा समावेश आहे. सर्व मिळून हे पॅकेज 98 लाख रुपयांचे होते.
युजर्सच्या प्रतिक्रिया
कार्तिकने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच ती प्रचंड व्हायरल झाली. टेक सेक्टरमध्ये दहा वर्षांचा दांडगा अनुभव असताना जर हे पॅकेज मिळत असेल तर याचा अर्थ टेक सेक्टरसुद्धा आता आधीसारखे राहिले नाही. या सेक्टरलाही गळती लागली आहे, अशी कमेंट एका युजरने केली. दहा वर्षांचा अनुभव गाठीशी असूनही पॅकेच कमी आहे, असेही एकाने म्हटले आहे.