बारामती परिमंडळातील 95 टक्के भागातील वीजपुरवठा पूर्ववत, वीज कर्मचाऱयांचे चार दिवसांपासून अविरत परिश्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनासारख्या महामारीमुळे सारे जग थांबले असतानाही वीज कर्मचारी मात्र अखंडित वीजपुरवठय़ासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यातच ‘तौकते चक्रीवादळाने’ विस्कळीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कर्मचाऱयांनी घेतलेल्या अविरत प्रयत्नांमुळे बारामती परिमंडलाने सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील 95 टक्क्यांहून अधिक वीजपुरवठा पूर्ववत करण्यास यश मिळवले आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी वीजपुरवठय़ाचा आढावा वारंवार घेऊन प्रशासन गतिमान केले आहे. तसेच प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आवश्यक त्या भागात अतिरिक्त मनुष्यबळ देऊन काम वेळेत करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यांना लागणारे साहित्य व साधने मुबलक दिली आहेत. मात्र, वादळी वारे व पावसामुळे त्यात अडथळे येत असून, त्यावर मात करत काम सुरू आहे.

‘तौकते’ चक्रीवादळाने बारामती परिमंडलातील 56 वीज उपकेंद्रांना ठप्प केले होते. मात्र, महावितरणने यंत्रणा युद्धपातळीवर राबवून सर्व वीज उपकेंद्रे व त्यातून निघणाऱया वीज वाहिन्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. कोरोना रुग्णालये, केअर सेंटर, ऑक्सिजन प्लाण्ट आदी अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा सुरू केला होता. यामध्ये 54 उपकेंद्रे दुसऱयाच दिवशी सुरू झाली. मात्र, महाबळेश्वरमधील वेण्णालेक व कोळीआळी जीआयएस उपकेंद्रे सुरू होण्यास अडथळे येत होते. काल रात्री उशिरा ही दोन्ही उपकेंद्रे पूर्ववत झाली.

1438 पैकी 1415 गावांत वीजपुरवठा सुरळीत

बारामती परिमंडलात 7 लाख 24 हजार 388 ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यातील 7 लाख 12 हजार 420 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला. त्यासाठी 623 खांब उभे करण्यात आले. 1438 पैकी 1415 गावांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. तर, 145 रोहित्रांची दुरुस्ती बाकी आहे.

सातारा जिह्याला सर्वाधिक फटका

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सातारा जिह्याला बसला आहे. जिह्यातील 4 लाख 54 हजार 595 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातील 4 लाख 42 हजार 758 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अद्याप महाबळेश्वर व पाचगणी भागातील 8 हजार व कराड विभागातील 3100 ग्राहकांच्या वीजपुरवठय़ाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.