बार्शीजवळ ट्रॅक्टर-ट्रॅव्हल्सचा अपघात, दोघे जागीच ठार; दहाजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व लक्झरी बसचा अपघात होऊन दोघेजण जागीच ठार झाले आहेत, तर 10 जण गंभीर जखमी आहेत. बार्शी शहराजवळ बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर ही घटना घडली आहे. या अपघातात ट्रॅक्टरचे अक्षरशः तुकडे होऊन रस्त्याच्या कडेला पडले आहेत. तर, खासगी बसचा समोरचा भाग पूर्णतः चक्काचूर झालेला आहे.

बसचालक सिद्धार्थ अनिल शिंदे (रा. वसवडी, लातूर) व प्रवासी मनोज शिवाजी विद्याधर (रा. बोधनगर, लातूर) हे दोघे जागीच ठार झाले. ट्रॅक्टरचालक औदुंबर कोंढारे, बसमधील रहमताली सादीइअली सय्यद (वय 29), वसंत तुकाराम पाडोळे (वय 65), विठ्ठल नामदेव पांचाळ (वय 91), नेहा विजय साबळे (वय 52 ), पार्वती बाबुराव बचुटे (वय 49), अश्विनी राहूल कदम (वय 26), मनीषा बाळासाहेब नलावडे (वय 27), पूजा ज्ञानेश्वर बारोले (वय 38), कालिदास निरू चव्हाण (वय 26, सर्व रा. लातूर), विजया किसन पांचाळ (वय 47, रा. पुणे), हेमचंद्र दौलत मोरे (वय 40, रा. बारामती), दत्ता रवण कांबळे (वय 28, रा. बाभळगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी जखमींची नावे असून, ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

नांदणी या गावातून उसाने भरलेले दोन ट्रॉली ट्रॅक्टर विठ्ठल शुगर कॉर्पोरेशनकडे निघालेले होते. तर खासगी ट्रॅव्हल्स पुण्याहून लातूरला निघाली होती. बार्शी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बाह्यवळण रस्त्यावरील तिरकस पुलाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. मयत बसचालक सिद्धार्थ शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव तपास करीत आहेत.