
निवडणूक जरी संपली तरी महाराष्ट्ररक्षणाचा संग्राम संपलेला नाही, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.
महानगरपालिकांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांचे अभिनंदन करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षातर्फे निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं आणि दिवसरात्र कष्ट केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. त्याचसोबत त्या सर्व इच्छुक उमेदवारांचं देखील मी ऋण व्यक्त करतो, ज्यांनी त्यांची इच्छा बाजूला ठेवून त्यांचे महाराष्ट्रप्रेम जागृत ठेवले.”
आदित्य ठाकरे म्हणाले, “बलाढ्य धनशक्ती आणि सत्तेच्या शक्तीसमोर, यंत्रणांसमोर आपण जे आव्हान उभं केलं आणि जिंकून दाखवलं ते मोलाचं आहे. पैशाच्या आणि खोटेपणाच्या गोंगाटात मराठीचा आणि मुंबईचा सक्षम आवाज आपण टिकवून ठेवला आहे. आता निवडणूक जरी संपली असली तरी महाराष्ट्ररक्षणाचा आपला संग्राम संपलेला नाही. ४ वर्ष त्यांच्या हातात प्रशासक आणि महानगरपालिका, त्याचसोबत यंत्रणा, केंद्र आणि राज्य सरकार, निवडणूक आयोग होता, तरीही निकालाचे आकडे फार बोलके आहेत. त्यांनी आपले ५४ नगरसेवक आणि अनेक लोकांना फोडून देखील, आपले ६५ आले.”
ते म्हणाले, “जय पराजय होत राहतील, पण एक दिवस नक्कीच मुंबई त्यांच्या मालकासमोर ताठ मानेने उभी करू. एक दिवस असाही येईल की, राजकारण हे मुद्द्यांवर असेल, केलेल्या कामावर असेल, नैतिकतेवर असेल. ते दिवस आपण आणू. जय महाराष्ट्र.”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षातर्फे निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं आणि दिवसरात्र कष्ट केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
त्याचसोबत त्या सर्व इच्छुक उमेदवारांचं देखील मी ऋण व्यक्त करतो,…— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 17, 2026



























































