बीसीसीआय धनमशीन! क्रिकेट कमाईत 85 टक्के हिस्सा एकट्या बीसीसीआयचा

bcci-logo

क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणारे असंख्य रनमशीन आहेत. पण धनमशीन फक्त एकच आहे. ती म्हणजे बीसीसीआय. एका अहवालानुसार बीसीसीआयने गेल्या वर्षभरात 18,700 कोटींची कमाई केली आहे, जी जगातील क्रिकेटच्या कमाईतील चक्क 85 टक्के हिस्सा आहे. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेट संघ क्रिकेट जगतावर राज्य करत नसला तरी बीसीसीआय मात्र कुबेर आहे.

क्रिकेटच्या जगतात आयसीसीला सर्वाधिक महसूल हिंदुस्थानातूनच मिळत असल्यामुळे बीसीसीआयने आपसूक आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. क्रिकेटचे 90 टक्के उत्पन्न हे हिंदुस्थानी सामने आणि हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांच्या माध्यमातून जमा केले जात आहे. त्यामुळे हिंदुस्थान क्रिकेट जगातील सर्वात श्रीमंत मंडळ बनले आहे आणि हिंदुस्थानातील वाढते क्रिकेट पाहता बीसीसीआय क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट असणार, यात तीळमात्र शंका नाही. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयची वार्षिक कमाई 19 हजार कोटींच्या आसपास असून ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या उत्पन्नाच्या 28 पट आहे. ऑस्ट्रेलियाने वर्षभरात 79 दशलक्ष डॉलर्सची (660 कोटींची) कमाई केली असून तो कमाईच्या बाबतीत दुसऱया क्रमांकावर आहे. तिसऱया क्रमांकावर असलेल्या इंग्लंड क्रिकेट मंडळाने 59 दशलक्ष डॉलर्स इतकी एकूण कमाई केली आहे. विशेष म्हणजे, 22 हजार कोटींची कमाई दहा कसोटी क्रिकेटचा दर्जा असलेल्या संघांनी केली असून त्यापैकी 85 टक्के म्हणजेच तब्बल 19 हजार कोटींचा हिस्सा बीसीसीआयचा आहे.