राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे नवे बॉस

8

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणाऱ्याराहुल द्रविड यांच्या खांद्यावर आता आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बीसीसीआयच्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)च्या प्रमुखपदी राहुल द्रविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे 19 वर्षांखालील संघातील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविड यांच्या खांद्यांवर असणार आहे. याचसोबत द्रविड यांच्याकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्याक्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदावरील नियुक्तीचे अधिकारही देण्यात आले आहेत.

राहुल द्रविड याआधी हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र राहुल द्रविड यांना मिळालेल्या पदोन्नतीमुळे पारस म्हांब्रे आणि अभय शर्मा यांच्याकडे 19 वर्षांखालील क्रिकेट संघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. बीसीसीआयची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी पुढील बैठकीत द्रविड यांच्या नियुक्तीबद्दल अधिकृत घोषणा करेल, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱयाने दिली आहे. हिंदुस्थानी संघातील दुखापतग्रस्त खेळाडू हे वैद्यकीय सल्ल्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये येत असतात. इथे प्रशिक्षित डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंच्या फिटनेसची चाचणी होती. या सर्व प्रक्रियेवर राहुल द्रविड यांची नजर असणार आहे. यासंदर्भात हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाला द्रविड आपला अहवाल सोपवतील.

द्रविड यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ युवा खेळाडू, प्रशिक्षकांनाही द्रविड यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा युवा खेळाडू त्यांचे प्रशिक्षक या सर्वांनाच फायदा होणार आहे. याचसोबत हिंदुस्थान ‘अ’ आणि 19 वर्षांखालील क्रिकेट संघ ज्यावेळी दौऱयावर जाईल त्यावेळी काही दिवस राहुल द्रविड त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱयाने दिली. सध्याच्या घडीला हिंदुस्थानी संघात चमक दाखवणारे पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, विजय शंकर यांची कारकीर्द घडवण्यात राहुल द्रविड यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाने 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली होती.

आपली प्रतिक्रिया द्या