कोरोनामुळे बीसीसीआयवर आर्थिक संकट, दोन हजार कोटींचे नुकसान होणार

कोरोनाने आयपीएलच्या बायो-बबलचा फुगा पह्डल्याने ‘बीसीसीआय’ला अखेर ही टी-20 क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. उर्वरित आयपीएल कधी होईल हे आताच सांगता येणे शक्य नाही. दुर्दैवाने कोरोनाची दुसरी लाट लवकर आटोक्यात आली नाही आणि ‘आयपीएल’चे चौदावे पर्व अर्ध्यावरच रद्द करावे लागले तर बीसीसीआयचे किमान 2 हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

…तर 3 हजार कोटींचा नफा होणार

2019 च्या आयपीएलचे मूल्य जवळपास 47 हजार कोटी रुपये होते. गतवर्षीच्या सत्रात ‘बीसीसीआय’ला 4 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला होता. या वर्षीची आयपीएल स्पर्धा पूर्ण झाली तर ‘बीसीसीआय’ला 3 हजार कोटी रुपयांचा फायदा होईल असा अंदाज आहे. गतवर्षीची आयपीएल रद्द झाली असती तर ‘बीसीसीआय’ला जवळपास 3800 कोटी रुपयांचे नुकसान झाले असते. आयपीएलच्या यंदाच्या सत्रात गव्हर्निंग कौन्सिलने गतवर्षीप्रमाणे विशिष्ट मूल्य ठरवलेले नाही. त्यामुळे यंदाची आयपीएल अशी मधेच रद्द झाली तर ‘बीसीसीआय’ला 50 टक्के म्हणजेच जवळपास 2 हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

…म्हणून अट्टहास

आयपीएल म्हणजे ‘बीसीसीआय’ला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी होय. या स्पर्धेमुळे बीसीसीआयच्या महसुलात मोठय़ा प्रमाणात वाढ होते. शिवाय सरकारलासुद्धा योग्य वेळेत मोठा कर मिळतो. बीसीसीआयने 2007-08 पासून सरकारला 3500 कोटी रुपये कररूपाने दिले आहेत. आयपीएलपूर्वी बीसीसीआय ही एक सेवाभावी संस्था मानली जात होती.

बीसीसीआयने लीगमधून 40 टक्के कमाई अधिक कमाई केली आहे. टेलिग्राफच्या अहवालानुसार, जागतिक क्रिकेटची अर्थव्यवस्था सुमारे 15 हजार कोटी रुपये आहे. यातील 33 टक्के म्हणजे 5 हजार कोटी रुपये एकटय़ा आयपीएल स्पर्धेमधून येतात. यामुळेच या टी-20 लीगसाठी बीसीसीआयला जगातील इतर क्रिकेट बोर्डांचेही सहकार्य मिळत असते.

बीसीसीआयला उशिरा सुचलेलं शहाणपण

बीसीसीआयने मंगळवारी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे; कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टी-20 मुंबई लीगच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर यांनी मागील आठवडय़ातच टी-20 मुंबई लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना वाढत असतानाच स्पर्धेचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही. म्हणूनच टी-20 मुंबई लीग रद्द करत असल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या