
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
क्रिकेट चाहते हे आपल्याला देवासमान आहेत. कारण त्यांच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच हिंदुस्थानी क्रिकेट क्षेत्र आज जगाचे नेतृत्व करीत आहे. याचे भान ठेवून क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रशासकांनी क्रिकेटशौकिनांचा योग्य तो मान आणि आदर राखायलाच हवा. कारण चाहत्यांनीच क्रिकेटकडे पाठ फिरवली तर बीसीसीआय आणि खेळाडू दोघेही अडचणीत येऊ शकतात, अशा शब्दांत बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहलीचे कान पिळले आहेत. हिंदुस्थानी क्रिकेटपटू आवडत नसतील तर हा देश सोडा आणि दुसऱया देशात जाऊन राहा असा टोला विराटने त्याच्यावर टीका करणाऱया क्रिकेटशौकिनांना लगावला होता. त्यावरून उठलेल्या वादावर चौधरी यांनी आपले मत व्यक्त केले.
विराटने क्रिकेटशौकिनांना सुनावलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी विराटला ट्रोल करीत विराटचे उत्तर चाहत्यांना आवडले नसल्याचे सांगितले. आता त्याच विधानावरून बीसीसीआय खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी विराटला सुनावले आहे. आम्ही बीसीसीआयमध्ये क्रिकेट चाहत्यांचा सन्मान करतो. त्यांची आवड-निवड याचा मन ठेवतो. मला सुनील गावसकर फलंदाजी करताना पाहायला आवडायचे, पण त्याच वेळेस गॉर्डन ग्रिनीज, डेस्मंड हेन्स, विव्ह रिचर्डस् यांची धडाकेबाज फलंदाजी बघायलाही आवडायची. मला सचिन, सेहवाग, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड यांचा खेळ खूप आवडायचा. पण त्याचप्रमाणे मार्क वॉ, ब्रायन लारा आणि अन्य विदेशी क्रिकेटपटूंचाही धमाकेदार खेळ पाहावासा वाटायचा, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.
‘माझ्यावर कमेंट करणाऱ्याने ‘हे भारतीय’ असे शब्द वापरले होते. बस, मला हीच गोष्ट नजरेस आणून द्यायची होती. मीही व्यक्तीच्या निवडस्वातंत्र्याचा सन्मान करतो. या गोष्टीला फार गंभीरपणे घेऊ नका आणि दिवाळीच्या सणाचा आनंद लुटा,’- विराट कोहली, टीम इंडियाचा कर्णधार
विराट म्हणतो तसे आपले क्रिकेटचे चाहते देश सोडून दुसऱया देशात गेले तर आपले क्रिकेट बघायला कोण येणार? आपल्या क्रिकेटपटूंसोबत आणि बीसीसीआयसोबत विदेशी कंपन्या करोडोंचे करार कसे करतील. याचे भान क्रिकेटपटूंनी चाहत्यांवर टीका करताना ठेवायला हवे-अनिरुद्ध चौधरी, खजिनदार, बीसीसीआय
क्रिकेटच्या कौशल्यात देश आणू नये
क्रिकेट या खेळाच्या कौशल्याचे कौतुक करताना त्यात देश किंवा इतर गोष्टी आणू नयेत असे माझे स्पष्ट मत आहे असे सांगून चौधरी म्हणाले, शेन वॉर्न हा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज वाटायचा, पण अनिल कुंबळेला गोलंदाजी करताना पाहून अधिक आनंद व्हायचा. मला कपिलदेवचा खेळ आवडायचा तसेच रिचर्ड हॅडली, इयान बॉथम आणि इम्रान खान यांची तुफान गोलंदाजी पाहतानाही तेवढीच मजा यायची.




























































