आयसीसी वन डे वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. कर्णधार आणि खेळाडू म्हणूनही रोहितची कामगिरी उजवी राहिली. मात्र अंतिम लढतीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव सहन करावा लागला आणि घरच्या मैदानावर 2011 नंतर पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. मात्र वर्ल्डकप जिंकण्याची आणखी एक संधी टीम इंडियाकडे अवघ्या वर्षभरात चालून आली आहे.
आगामी वर्षी जून महिन्यामध्ये टी-20 वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे. वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. टीम इंडियाने या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. नुकतीच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळली आणि आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरेल. मात्र सूर्या नियमीत कर्णधार नाही, त्यामुळे आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न आहे.
वन डे वर्ल्डकपनंतर अनेक दिग्गजांनी रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करावे अशी भूमिका मांडली. मात्र रोहित शर्माने आपला अखेरचा टी-20 सामना गेल्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर टी-20चे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले. पण आगामी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची धुरा पुन्हा रोहितच्या खांद्यावर येण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना विचारले असता त्यांनीही स्पष्ट उत्तर देणे टाळल्याने सस्पेन्स कायम आहे.
डब्लूपीएल लिलाव : काशवी गौतम ठरली महागडी खेळाडू, वृंदा दिनेशही बनली करोडपती
काय म्हणाले जय शहा?
जय शहा यांनी शनिवारी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित टीम इंडियाचे नेतृत्व करणार का? असा सवाल केला असता जय शहा यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. आताच हे स्पष्ट करण्याची गरज आहे का? टी-20 वर्ल्डकतप जूनमध्ये सुरू होणार आहे. त्याआधी आपल्याला आयपीएल आणि अफगाणिस्ताविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे, असे जय शहा म्हणाले.
राहुल द्रविडचा फैसला आफ्रिका दौऱ्यानंतर
बीसीसीआयने राहुल द्रविड आणि इतर स्टाफचा कार्यकाळ वाढवला. मात्र तो कधीपर्यंत वाढवला हे गुलदस्त्यात ठेवले. यावरही जय शहा यांनी भाष्य केले. कार्यकाळ वाढवण्यात आला असला तरी कराराला अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही. आमच्याकडे सध्या वेळेचा अभाव आहे. आम्ही द्रविड आणि सपोर्ट स्टाफसोबत बैठक घेऊन कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका दौऱ्याननंतर यावर पुन्हा चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असे जय शहा म्हणाले.