डब्लूपीएल लिलाव : काशवी गौतम ठरली महागडी खेळाडू, वृंदा दिनेशही बनली करोडपती

महिला प्रीमियर लीगच्या (डब्लूपीएल) दुसऱ्या सत्रासाठीचा लिलाव शनिवारी (दि.9) झाला. हिंदुस्थानची काशवी गौतम आणि अनकॅप्ड वृंदा दिनेश यांना या लिलावात लॉटरी लागली. काशवी गौतमला 2 कोटी आणि वृंदा 1.30 कोटींना विकल्या गेल्या. दोघांची मूळ किंमत प्रत्येकी 10 लाख रुपये होती. ऑस्ट्रेलियाच्या एनाबेल सदरलँडलाही दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले, ती सर्वात महागडी परदेशी खेळाडू ठरली.

‘डब्लूपीएल’च्या लिलावात सर्व संघ मालकांनी मिळून एकूण 30 खेळाडूंची खरेदी केली. यात 9 परदेशी, तर 21 हिंदुस्थानी खेळाडूंचा समावेश आहे. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या लिलावात संघमालकांनी 30 खेळाडूंवर 12.75 कोटी रुपये खर्च केले. या लिलावात 90 खेळाडूंची नावे मागवण्यात आली होती. डिआंड्रा डॉटिन, चामरी अटापट्टू, देविका वैद्य, एमी जॉन्स व किम गर्थ यांना कोणीच विकत घेतले नाही.

5 खेळाडू बनल्या करोडपती

‘डब्लूपीएल’च्या लिलावात 5 खेळाडू करोडपती बनल्या. वृंदा दिनेश हिला यूपी वॉरियर्सने 1.30 कोटी रुपयांना खरेदी केले, जी मूळ किमतीपेक्षा 13 पट अधिक आहे. गुजरात जायंट्सने कारावी गौतमसाठी 2 कोटी रुपये मोजले. ऑस्ट्रेलियाच्या फोबी लिचफिल्ड (1 कोटी) आणि दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माईल (1.20 कोटी) यांनाही लिलावात एक कोटीहून अधिक रुपये मिळाले. लिचफिल्डला गुजरातने, तर शबनिमला मुंबईने विकत घेतले.