बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा 27 जुलैला शुभारंभ, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडीडी चाळीच्या महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ येत्या 27 जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

वरळी, ना. म. जोशी मार्ग, शिवडी आणि नायगाव येथील शासनाच्या 34.05 हेक्टर जागेवर 195 चाळी आहेत. प्रत्येक चाळ ही तळ अधिक तीन मजल्यांची असून त्यात प्रत्येकी 80 रहिवासी गाळे आहेत. या चाळींचा पुनर्विकास करून चाळीतील निवासी पात्र गाळेधारकांना 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य आणि मालकी हक्काने देण्यासाठीचा तसेच या ठिकाणच्या झोपडीधारकांना महाराष्ट्र झोपडपट्टी निर्मूलन अधिनियमातील तरतुदीनुसार पात्र झोपडपट्टीधारकांप्रमाणे 269 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या जमिनीवर या योजनेद्वारे 15 हजार 593 पुनर्वसन गाळ्यांव्यतिरिक्त सुमारे 8 हजार 120 विक्रीयोग्य गाळे बांधण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

राज्य सरकारच्या जागेवर 15 हजार 593 गाळे, स्टॉल्स आणि अधिकृत झोपडय़ा आहेत. बीडीडी चाळींचा विकास नियंत्रण नियमावली 33,(9),( ब) च्या अंतर्गत करण्यात येणार आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी शासनाने म्हाडाची सुकाणू अभिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प योग्य रितीने राबविण्यासाठी म्हाडास मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. बीडीडी चाळीतील पात्र रहिवाशांना 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळ आकाराची घरे वितरित करण्यात येतील, असेही आव्हाड म्हणाले.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योगमंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज डी.पाटील, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळचे सभापती विजय नाहटा व अन्य उपस्थित राहणार आहेत.

नायगाव-ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळी

पुनर्विकास प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून काही रहिवाशांना प्रकल्प जागेजवळ असलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील पुनर्विकास प्रकल्प येत्या सात वर्षांत तर वरळी येथील प्रकल्प येत्या आठ वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही आव्हाड यांनी दिली.

प्रस्तावित प्रकल्पाचा तपशील

– नायगाव योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या 3 हजार 344 असून पुनर्वसन इमारत 22 मजल्यापर्यंत आणि विक्रीयोग्य इमारत 60 मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे.
– ना. म. जोशी मार्ग योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या 2 हजार 560 असून पुनर्वसन इमारत 22 मजल्यापर्यंत आणि विक्रीयोग्य इमारत 40 मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे.
– वरळी योजनेत चाळीतील पुनर्वसन गाळ्यांची संख्या 9 हजार 689 असून पुनर्वसन इमारत 40 मजल्यापर्यंत आणि विक्रीयोग्य इमारत 66 मजल्यापर्यंत प्रस्तावित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या