
एचओडी आणि प्राध्यापकांच्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून बीडीएसच्या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. कॉलेज इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थ्याने जीवन संपवलं. निथिन राज आर.एल. असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. केरळच्या कन्नूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. मयत निथिन अंजारकंडी डेंटल कॉलेजमध्ये बीडीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. याप्रकरणी चक्करक्कल पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, 10 एप्रिल रोजी निथिन राज कॉलेजच्या कँम्पसमध्ये जखमी अवस्थेत सापडला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कॉलेजमधील एचओडी आणि काही प्राध्यापक मानसिक त्रासासह इंटनरल मार्क कमी करण्याची धमकी देत होते. याच तणावातून निथिनने टोकाचं पाऊल उचलले, असा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
चक्करक्कल पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, सर्व बाबींचा तपास सुरू आहे. केरळ राज्य मानवाधिकार आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. निथिन राज हा तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील नेदुमंगडचा रहिवासी होता. त्याचे आई-वडील रोजंदारीवर मजुरीचे काम करतात.

























































