
थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्याच्या फुल टू मूडमध्ये असणाऱ्यांनो, मनसोक्त एन्जॉय करा! खा, प्या, मौजमस्ती करा, पण कायद्याचे उल्लंघन करू नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, कायदा व सुव्यस्था बिघडेल असे कृत्य चुकूनही करू नका. नाहीतर कठोर कारवाई केली जाईल अशी तंबीही त्यांनी दिली आहे. हॉटेल, बार पहाटे पाचपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असली तरी बोट पार्टीला कोणत्याही प्रकारे परवानगी देण्यात येणार नाही, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
40 हजारांहून अधिक पोलीस तैनात
थर्टी फर्स्टसाठी 40 हजारांहून अधिक अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर बंदोबस्ताला तैनात असणार आहेत. शिवाय सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बी.डी.डी.एस, विशेष शाखा, गुन्हे शाखा, वाहतूक पोलीस, होमगार्ड असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही वॉचबरोबरच साध्या वेषातील पोलिसांची गस्त असणार आहे. समुद्रकिनारी बोटीतून सतर्क गस्त घालण्यात येणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी विशेष नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येणार आहे. ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह आणि रश ड्रायव्हिंग करणाऱयांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
हेल्पलाइन
कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास किंवा काही संशयास्पद वाटल्यास 100 नंबर, मुंबई पोलिसांचे ट्विटर ंिकंवा 7738133133/7738144144 या क्रमांकांवर मेसेज पाठविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
हे लक्षात ठेवा!
ध्वनिक्षेपण कायदा व नियमांचे पालन करणे बंधनकारक.वाढीव वेळेची परवानगी केवळ बंदिस्त जागेतील तसेच इमारतीमधील आस्थापनांनाच देण्यात येणार आहे.
आस्थापनेच्या आत किंवा बाहेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास पूर्णपणे आस्थापनाधारक जबाबदार राहील.
थर्टी फर्स्टला सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक वापरण्याची मुभा असणार आहे.
प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करा.



























































