शेतकऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर संचालक मंडळाला जाग; पुणे बाजार समितीत डमी आडत्यांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे बाजार समितीत शेतकर्‍याला डमी आडत्याने मारहाण केल्यानंतर आता संचालक मंडळाला जाग आली आहे. सुमारे अकरा महिन्यानंतर संचालक मंडळाला जाग आली आहे. बाजार समितीत मंगळवारपासून बेकायदा आणि डमी आडत्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत गाळ्यवरील डमी आणि गाळ्या समोरील 15 फुटाच्या बाहेरील वापरण्यात येणार्‍या जागांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ.राजाराम धोंडकर यांनी सांगितले.

शेतकरी मारहाण प्रकरणानंतर बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी त्यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत डमी आडत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेस सभापती दिलीप काळभोर, उपसभापती सारिका हरगुडे, संचालक दत्तात्रय पायगुडे, संचालिका मनिषा हरपळे, सचिव डॉ.राजाराम धोंडकर उपस्थित होते. शेतकरी मारहाण प्रकरणी संबंधित मुळ गाळेधारकाला नोटीस दिली असून नोटीसीवर समाधानकारक उत्तर न आल्यास परवाना निलंबित केला जाईल, असे सभापती यांनी सांगितले.

दोन्ही संचालकांच्या गाळ्यावर कारवाई करणार
बाजारातील आडते व व्यापारी गटातील गणेश घुले आणि अनिरूध्द भोसले या दोन्ही संचालकांच्या गाळ्यांवर डमींची संख्या जास्त असून गेट नंबर एक आणि गेट नंबर तीनवर रस्त्यावर व्यापार केला जात आहे. मात्र, या दोन्ही संचालकांकडे आम्ही व्यापारी म्हणूनच पाहतो. त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाणार आहे, असे सभापती दिलीप काळभोर यांनी सांगितले.

नियमबाह्य निर्णयांची माहिती देणे टाळले
संचालक मंडळाच्या काळात फुलबाजारात नियबाह्यपध्दतीने परवाने वाटप, फुलबाजार प्रतिक्षायादीत 22 जणांची नावे घुसवण्याच्या प्रस्ताव, घेतलेले निर्णय रद्द करणे, ओपन स्पेस घोटाळा आदी अनेक नियमबाह्य केलेल्या गोष्टींच्या प्रश्नांवर सचिव डॉ.धोंडकर आणि सभापती यांनी उत्तरे देणे टाळले.

पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसराचा वाढता विस्तार पाहता या दोन्ही शहरांभोवतीच्या महामार्गालगत उपबाजार उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. कोरेगाव मुळ 11 एकर जागा, खेड शिवापूर 5 एकर, उत्तमनगर 4 एकर, पेरणे 10 एकर आदि ठिकाणांचा विकास आराखडा केला जात आहे. मोशी येथील उपबाजारातील सात एकरवर 270 कोटी रूपयांचा विकास आराखडा शासनाला सादर केला आहे.
– दिलीप काळभोर, सभापती, बाजार समिती पुणे.