
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून रेल्वेकडून मिळणाऱ्या काही सुविधांमध्ये कपात करण्यात आली होती. त्यात चादर आणि ब्लँकेटचा समावेश होता. आता ही सुविधा सुरू करण्याचा विचार रेल्वे करत आहे.
या सेवेत आता थोडा बदल केला जाणार आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आता थंडीचा मोसम सुरू झाल्याने दिल्लीसह अनेक रेल्वे स्थानकांवर डिस्पोझेबल चादरी, ब्लँकेटसारख्या वस्तू मिळणारी दुकानं सुरू करण्यात आली आहेत.
या दुकानांवर तीन प्रकारचे किट मिळणार आहेत. पहिल्या किटमध्ये एक ब्लँकेट, चादर, उशी-अभ्रा, बॅग, टूथपेस्ट, केसांना लावायचं तेल, कंगवा, सॅनिटायझरचा सॅशे, पेपर सोप आणि टिश्यू पेपर मिळतील. त्याची किंमत 300 रुपये इतकी असेल.
दुसऱ्या प्रकारच्या किटमध्ये फक्त ब्लँकेट मिळेल. त्या किटची किंमत 150 रुपये इतकी असेल. तिसऱ्या किटमध्ये टूथपेस्ट, ब्रश, तेल, कंगवा, सॅनिटायझर, पेपर सोप आणि टिश्यू पेपर असतील. त्याची किंमत 30 रुपये इतकी असेल.
दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही, असं म्हटलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहून मगच यावर निर्णय घेतला जाईल. पण, सध्या थंडीचा मोसम सुरू झाल्याने डिस्पोझेबल ब्लँकेट मिळणारी दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.





























































