तुझ्यामुळे नापास झालो, वर्षभराची फी दे! प्रेमवेड्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। संभाजीनगर

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. पण आपल्या अपयशाचे खापर प्रेयसीवर फोडून तिच्याकडून त्या मोबदल्यात पैसे मागणारा प्रियकर हा तसा विरळाच. पण बीड जिल्ह्यात अशाच बीएमएसएस मध्ये शिकणाऱ्या प्रेमवेड्याने परिक्षेत नापास झाल्यामुळे प्रेयसीकडून वर्षभराची फी मागितली आहे. यामुळे पोलिसांनी फसवणूक व पैसे वसूलीचा गुन्हा त्याच्यावर नोंदवला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

गेल्याच वर्षी या तरुणाचे त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध जुळले. तो तिच्या प्रेमात इतका वेडा झाला की जळी ,स्थळी ,जिकडे तिकडे त्याला प्रेयसीच दिसू लागली. याचा थेट परिणाम त्याच्या अभ्यासावर झाला. कारण प्रेमात सैराट झालेल्या या प्रियकराचे मन अभ्यासातून उडून प्रेमात गुंतले होते. अभ्यासात एकाग्रता नव्हती. त्यामुळे तो नापास झाला.

त्यासाठी त्याने प्रेयसीला जबाबदार ठरवले. तुझ्यामागे माझा वेळ गेला. अभ्यास करता आला नाही. यासाठी तूच जबाबदार आहे. म्हणून तूच माझ्या बुडालेल्या फीचे पैसे दे असा तगादा त्याने प्रेयसीच्या मागे लावला. तो तिला वाटेल तेव्हा फोन करायचा. मेसेज करून हैराण करायचा. त्यानंतर त्याने फेसबुकवर तिचे फोटो टाकण्याची धमकी दिली. अखेर त्याच्या रोजरोजच्या या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसात तक्रार केली.