
बीड शहराची तहान भागवणारा तालुक्यातील पाली जवळील बिंदुसरा मध्यम प्रकल्प आज गुरूवारी सकाळी 100 टक्के भरला असून प्रकल्पाच्या छोट्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गत तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
प्रकल्प भरल्याने बिंदुसरा नदीच्या पात्रात सध्या वेगाने पाणी वाहत आहे. पाटोदा तालुक्यातील भायाळासह बीड तालुक्यातील पोखरी, बांगरवाडा, बेलखंडी पाटोदा, नागझरी, कदमवाडी या परिसरात पाऊस झाल्याने बिंदुसरा प्रकल्पावरील डोकेवाडा साठवण तलाव ओसंडून वाहत असून या तलावाचे पाणी थेट बिंदुसरा नदीतून प्रकल्पात येत आहे. त्यामुळे बिंदुसरा प्रकल्पही शंभर टक्के भरला आहे. प्रकल्पाचे पाणी लहान चादरीवरून वाहू लागले आहे. या धरणाची क्षमता 7.90 दलघमी आहे.
दुसरीकडे नेकनूर, गवारी, रत्नागिरी, कपीलधार परिसरातील पावसामुळे कर्झणी येथील तलाव भरला असून खटकाळी बंधाऱ्यातून वाहणारे पाणी बिंदुसरा नदीपात्रात जावून मिळत असल्याने सध्या बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
बिंदुसरा नदीचा उगम पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील डोंगराळ भागात होतो. ही सिंधफणाची एक उपनदी आहे. बिंदुसरा नदीवर पालीजवळ मध्यम प्रकल्प असून बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते. पुढे सिंदफणा गोदावरीला नदीला मिळते.
बीड जिल्ह्याचा पाण्याचा मुख्य स्त्रोत हा गोदावरी नदीचा असून याच नदीने जिल्ह्याची उत्तर सीमा निश्चित केली आहे. गोदावरी बरोबरच सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वाण या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून मांजरा ही दुसरी महत्वाची नदी वाहते. चौसाळा, केज, रेना व लिंबा या मांजरा नदीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात.































































