
उदय जोशी, बीड
बीड जिल्ह्याचे वाळवंट होऊ पाहत आहे , दुष्काळाचे संकट ओढवले नाही तर बोलावून घेतले , गेल्या वीस वर्षांत लोकसंख्या दुपटीने वाढली, शेतीचे सिंचन आणि फळबागा वाढल्या , पाण्याचा वापर वारेमाप झाला त्या तुलनेत पाणी अडवण्याचे कामे झाले का ? तर नाही , शेतकऱ्यांना ढाल करून स्थानिक कार्यकर्त्यांनी आपले खिसे भरले, मावेजा मिळाली नाही म्हणू काही प्रकल्पाचे काम बंद पडले, कामाचे अंदाज पत्रक वाढवण्यासाठी गुत्तेदारानी वेळ काढू पणा केला, काही लोकप्रतिनिधींनी धरणाच्या कामात खोडा घातला, तब्बल सात साठवण तलाव काम अडवल्या मुळे पूर्ण होऊ शकली नाहीत ,वीस वर्षांत अपवाद वगळता एक ही सिंचन प्रकल्प पूर्ण झाला नाही, जो एक प्रकल्प पूर्ण झाला त्या अप्पर कुंडलिक प्रकल्पात आज 40 टक्के पाणीसाठा आहे जिल्ह्याची मदार या प्रकल्पावरच आहे असे इतर प्रकल्प पूर्ण होऊ दिले असते तर दुष्काळाच्या झळा निदान सोसल्या गेल्या असत्या , दुष्काळाच्या या पापाला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
संपूर्ण बीड जिल्ह्यातील पाणी साठा अर्ध्या टक्क्यांवर येऊन ठेपला, उन्हाळ्यात शेतीचे सिंचन तर सोडाच उभ्या फळबागा जळून खाक झाल्या, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी टँकर ची प्रतीक्षा करावी लागत आहे , हंडाभर पाण्यासाठी दिवस-रात्र जीवघेणी कसरत करावी लागत आहे, पाण्याची पातळी खालावत गेली. आठशे फुटापर्यंत फक्त मातीचा धुराळा उडत आहे, कसे बसे लागलेले पाणी कधीही गायब होऊ शकते. पावसाळ्यात भरलेली धरणे सहा महिन्यात कोरडी पडू लागली उथळ झालेली धरणे पाण्याऐवजी गाळाने भरली ,पावसाळ्यात पाणी वाहून गेले आणी उन्हाळ्यात प्रत्येक थेंबाचे महत्व जाणवू लागले. लोकसंख्या वाढली , पाण्याचा वापर ही वाढला. गेल्या वीस वर्षांत लोकसंख्येत पंधरा लाखांची भर पडली, साखर कारखाने वाढले ,ऊसाचे क्षेत्र कित्येक पटीने वाढले मात्र या तुलनेत पाणी साठा मात्र वाढला नाही, पाणीसाठा वाढवणारी धरणे ही झाली नाहीत म्हणूनच दुष्काळाची तीव्रता अधिक वाढली, दुष्काळ हा बीड जिल्ह्यासाठी कलंक आहे, कोण आहे या पापाचे वाटेकरी ? अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
युती सरकार च्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यात विशेषतः डोंगरपट्यात साठवण तलाव केले या साठवण तलावामुळे ऊसतोड कामगार ऊस उत्पादक झाला, उजाड डोंगरपट्टा आज फळबाग आणी भाजीपाल्याची शेती करत आहे , युती सरकारच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 44 साठवण तलाव आणि प्रकल्प पूर्ण करण्यात आले होते. त्या नंतर मात्र सिंचन क्षेत्र वाढले नाही, तलावाच्या कामाचा वेग मंदावला, युती सरकारने मंजूर केलेली सिंचनाची कामे आघाडी सरकारच्या काळात भिजत पडली, कधी निधी अपुरा पडल्याने, कधी प्रकल्पाचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने तर कधी मावेजा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कामे अडवली, यात शेतकऱ्यांची भूमिका कदाचित योग्य असेल पण मावेजा साठी धरणाचे काम अडवल्याचा फटका आज शेतकऱ्यांनाच जास्त सहन करावा लागत आहे, जर हे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण झाले असते तर आज दुष्काळात या प्रकल्पातील पाणी साठ्याचा मोठा आधार झाला असता, यातीलच एक अप्पर कुंडलिका प्रकल्प आज बीड जिल्ह्याला आधार देत आहे केवळ याच एकमेव प्रकल्पात 40 टक्के पाणी साठा शिल्लक आहे,बीड जिल्ह्यातील सात साठवण तलावाची कामे मावेजा आणि इतर कारणामुळे बंद पडली पाच ते दहा वर्षांपासून ही कामे रखडल्या गेली , या साठवण तलावाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर आज ही साठवण तलाव बीड जिल्ह्यासाठी वरदान ठरली असती, हीच परिस्थिती सिंधफना धरणाची आहे या प्रकल्पाच्या उंची वाढवण्याचे काम लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बंद पाडले, आज या प्रकल्पाची उंची वाढली असती तर शेकडो गावातील दुष्काळ नामशेष झाला असता. या सर्व घटनांमध्ये शेतकऱ्यांची भूमिका योग्य असेल शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न तातडीने सोडवून यावर उपाय शोधता आला असता मात्र तत्कालीन सरकारने , अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, शेतकऱ्याचा मावेजा वेळेत दिला असता तर आज सर्व प्रकल्प पाण्याने भरले असते.
काम अडवा..दुष्काळ जिरवा..!
पाणी अडवा..पाणी जिरवा या संदेश ऐवजी बीड जिल्ह्यातील तुम्ही आम्ही काम अडवा दुष्काळ जिरवा याचा आदर्श घेतला , थोड्याशा कारणासाठी सिंचनाचे काम अडवले गेले, प्रकल्पाच्या कामात खोडा घातला गेला, गुत्तेदारांना काम करू न दिल्याने यातील बहुतांश प्रकल्प अर्धवट राहिले तर काही प्रकल्पाना पूर्ण करण्यास अवधी लागला, या प्रकल्पाचे काम अडवले गेले नसते आणि प्रकल्प पूर्ण झाले असते तर दुष्कळांची तीव्रता नक्कीच कमी झाली असती.
काम रखडलेले साठवण तलाव
गेल्या दहा वर्षांपासून भिजत पडलेली सात साठवण तलावांची कामे बंद पाडल्याने रखडले आहेत या मध्ये झापेवाडी साठवण तलाव, मदानापूर, सात्रा पोत्रा ,कपिळधार वाडी, आरणवाडी, कचारवाडी या साठवण तलावाचा समावेश होतो , यातील आरणावाडी साठवण तलाव रस्त्यामुळे बंद होता उर्वरित साठवण तलावाचे कामे स्थानिक लोकांच्या विरोधामुळे बंद आहेत. किंवा अद्याप सुरूच करण्यात आली नाही
चितळे समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष
बीड जिल्ह्यातील सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत, दुष्काळ संपवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी चितळे समितीने अभ्यास केला होता, दर चार वर्षाला समाधानकारक पाऊस पडतो मात्र ते पाणी तलाव भरल्यानंतर वाहून जाते त्यासाठी बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा या दोन मोठ्या प्रकल्पासह 16 मध्यम आणी सर्व लघु अशा एकूण 144 प्रकल्पाची उंची वाढवून 30 टक्के पाणी साठा वाढवण्याच्या सूचना आणि अहवाल देण्यात आला होता मात्र या अहवालावर अंमलबजावणीच झाली नाही






























































