
बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे बीडमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला, अक्षरश: कापणीला आलेले पीक डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना शेतकऱ्यांना पाहावे लागत आहे. या सर्वामध्ये सध्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात व्हिडीओत सदर शेतकऱ्याने सत्ताधाऱ्यांना फटकारले असून असेच हाल होत राहिले तर जीवन संपवण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराच सरकारला दिला आहे.
View this post on Instagram
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बेलगाव गावातील शेतकरी जगनराम किसनराव यांचा हा व्हिडीओ असून ते एक अल्पभूधारक शेतकरी असल्याचे त्यांनी व्हायरल व्हिडीओत म्हटले आहे. ” घरची शेती कमी असल्याने मी दुसऱ्याची शेती कसतो आहे. आजची शेताची परिस्थिती पाहा. पूर्ण शेतात पाणीच पाणी झाले आहे. सोयाबिनला कोंब आले आहेत. सोयाबिनसारखीच तुरीचेही हाल आहेत. कापूस काळा पडला आहे. सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कृषीमंत्री दत्तामामा भरणे बाहेर पडा, शेतकऱ्यांचे हाल बघा. दोन एकर सोयाबिन पूर्ण काळं पडलं आहे. एवढे हाल होतायत. पोटाला चिमटा काढून शेतकरी शेतावर खर्च करतो. आता हा पूर्ण माल वाया गेल्यानंतर काय उरणार आम्हाला. मुलांचे शिक्षण कसं करणार. आज मुलांच्या तोंडातला घास काढून शेतमाल खरेदी केलाय. आता मुलांना काय खायला देणार? घरप्रपंच कसा चालवायचा? आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे जगनरामने कृषीमंत्र्याना सुनावले आहे.
ई पिक पाहणीवरही भडकला
सरकारने आम्हाला ई पीक पाहणी करायला लावली पण त्याचा सर्व्हर कायम डाऊन राहिला. त्यामुळे माझ्या शेताची पाहणी झालेली नाही. तर हे अनुदान पिकविमा कसं मिळेल मला. कसं करायचं, त्यामुळे सरकारने या सगळ्याकडे न पाहता. सरसकट कर्जमाफी व पिकविमा द्या, अशा शब्दात जगनराम पिकविम्यावरून सरकारवर भडकला.