
माजलगाव येथील नगरपालिकेतंर्गत विविध रस्त्यांची कामे न करताच 1 कोटी 61 लाख रूपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणातील 14 महिन्यापासून फरार असलेला मुख्याधिकारी बी. सी. गावित शुक्रवारी पहाटे आष्टी (जि. बीड) पोलीस ठाण्यात हजर झाला. तो 14 महिन्यांपासून फरार होता. आता तो स्वतःहून पोलिसांना शरण आला आहे.
2017 पूर्वी असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या काळात विविध रस्त्यासाठी 1 कोटी 61 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या.त्यानंतर सहाल चाऊस नगराध्यक्ष झाले होते. त्यावेळी मुख्याधिकारी बी.सी.गावीत होते. या दोघांनी व लेखापाल यांनी 2017 मध्ये संगनमत करून ही रक्कम कामे न करताच उचलली होती.
डिसेंबर 2019 मध्ये प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी विवेक जॉनसन यांनी मुख्याधिकारी व दोन लेखापालांविरूध्द अपहाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गावीत फरार झाले होते. मार्च 2020 मध्ये नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर चाऊस अटकेत होते. त्यांना 15 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. मुख्याधिकारी गावीत तेव्हापासुन फरार होते. ते शुक्रवारी सकाळी आष्टी येथील पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.



























































