बीड जिल्ह्याला लागतोय दररोज 2 कोटी 74 लाख लिटर ऑक्सिजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. रूग्ण गंभीर झाल्यावर रूग्णालय गाठत आहेत. त्यामुळे गंभीर रूग्णांची संख्या मोठी आहे. त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. दररोज लागणारे ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशीच परिस्थिती अंबाजोगाईच्या लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्येही आहे.

बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या आठ दिवसांपासून हजाराच्या पुढे आहे. बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. आरोग्य प्रशासनावर मोठा ताण येत आहे. एक जण बाधित निघाले की त्याचे पूर्ण कुटुंब या संकटात सापडत आहे. रूग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. बीड जिल्ह्यामध्ये सध्या 1557 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. या रूग्णांसाठी रोज 2 कोटी 74 लाख 89 हजार लिटर ऑक्सिजन लागते. बीडला लागणाऱ्या ऑक्सिजन बीडजवळील खाजगी प्लँटवरून उपलब्ध करावे लागते, शासकीय आणि खाजगी रूग्णालयाला याच प्लँटवरून ऑक्सिजनचा पुरवठा होतो.

शासकीय रूग्णालयासाठी लागणाऱ्या ऑक्सिजन मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते, अशीच परिस्थिती अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयाची आणि लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरची आहे. अंबाजोगाई वगळता इतर तालुक्याला बीडवरून पुरवठा होतो. मात्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला मर्यादा असल्यामुळे अंबाजोगाईसाठी लागणारे ऑक्सिजन लातूर, जालना येथून मिळवावा लागतो. ऑक्सिजन मिळवण्यासाठी सकाळपासूनच वरिष्ठ अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी ऑक्सिजनचे कंटेनर पोहचण्यास उशिर झाला तर परिस्थिती गंभीर होतेय की काय अशी शक्यता निर्माण होते, आजच अंबाजोगाईच्या स्वाराती आणि लोखंडी सावरगाव येथील कोविंड सेंटरला लागणाऱ्या ऑॅक्सिजन पुरवठ्यासाठी ऑक्सिजन प्लँट टाकण्याची मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी सरकारकडे केली आहे.