माजलगावात टेंबे गणपतीचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या व 125 वर्षाची निजामकालीन परंपरा असलेल्या प्रसिद्ध अशा टेंबे गणपतीचे सोमवारी प्रतिपदे दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत व पेटत्या टेंब्यांच्या साक्षीने वाजत गाजत व गणरायाच्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीद्वारे करण्यात आले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन 1901 साली येथील ब्रम्हवृन्दानी गणपती उत्सव सुरू केला होता. निजाम राजवटीत या गणपतीला रजाकारांनी मिरवणूक अडवून परवानगी नाकारली म्हणून गणपती जागीच ठेऊन हैदराबाद येथे जाऊन परवानगी आणण्यात आली. त्यानंतर भाद्रपद एकादशी दिवशी स्थापना व प्रतिपदेस विसर्जन करण्यात येते. आजतागायत हीच परंपरा कायम आहे.

या वर्षी तिथीप्रमाणे टेंबे गणपतीची स्थापना 3 रोजी भाद्रपद एकादशी दिवशी मोठ्या उत्साहात करण्यात आली होती. त्यानंतर दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, रक्तदान शिबीर, पोटविकार तपासणी, ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी, अन्नदान असे कार्यक्रम घेण्यात आले. आज प्रथेप्रमाणे प्रतिपदा दिवशी विसर्जन करण्यात येते. त्यानुसार सायंकाळी सहाच्या सुमारास भटगल्लीतील टेंबे मंदिराबाहेर गणपतीची आरती करून एका सजवलेल्या ट्रॅक्टरवर गणपती विराजमान करून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

गणपतीचा जयजयकार करत भाविक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. तर अनेक भाविक आपला बोललेला नवस पूर्ण झाला म्हणून त्याची फेड करण्यासाठी हाती पेटते टेंबे घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर मिरवणूक मार्गावर गणरायाला निरोप देण्यासाठी हिंदू बांधवांच्या घराघरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. आपापल्या घरासमोर मिरवणूक येताच आरत्या करण्यात येत होत्या. मिरवणुकीत देखावे आकर्षण ठरले.

मठगल्लीमार्गे हनुमान चौक ते झेंडा चौक अशी मिरवणूक काढत सिंदफना नदीत गणरायाचे विसर्जन रात्री करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मंडळाचे सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी अध्यक्ष अनंत जोशी, कल्याण नरवाडकर, सुरेंद्र जोशी, अ‍ॅड.चैतन्य जोशी, वैभव जोशी, अनिल मुळी, बंडू जोशी, शंभू जोशी, निखिल मुळी, किशोर जोशी, शिवाजी देशमुख यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.