
केवळ सत्तेसाठी गुंडाळलेले मिंध्यांचे सोवळे गळून पडले! अजित पवार गट, मिंध्यांनी रझाकारांसोबत सत्तेसाठी संग केला. ज्यांच्यासोबत बसायची मिंध्यांना लाज वाटत होती, त्याच अजित पवार गटाच्या मांडीला मांडी लावून नव्हे, एमआयएमला मांडीवर घेऊन बीड, परळीत नवी युती जन्माला आली!
केवळ सत्तेसाठी भाजपचे झालेले अधःपतन राज्यातील जनतेने बघितले. अकोला जिल्ह्यात अकोट येथे भाजपने चक्क रझाकारांची संघटना असलेल्या एमआयएमशी दोस्ताना केला. केवळ सत्ता मिळवण्यासाठी भाजपने एमआयएमला सोबत घेतले. भाजप आणि एमआयएमच्या युतीचे बिंग फुटले आणि राज्यात एकच खळबळ उडाली. हिंदुत्वाच्या बाजारगप्पा मारणाऱ्या भाजपचे लबाड ढोंग उघड झाले. राज्यभरात छी थू झाल्यानंतर भाजपने हा दोस्ताना तुटल्याचे सांगितले.
भाजप एमआयएमच्या दोस्तीची चर्चा सुरू असतानाच आज बीड आणि परळीत अजित पवार गट, मिंधे यांनी सत्तेसाठी एमआयएमच्या गळय़ात गळे घातले. शिवसेनेशी गद्दारी करताना याच मिंध्यांनी अजित पवारांच्या नावाने खडे फोडले होते. त्याच पवारांची सोबत करताना मिंध्यांनी एमआयएमलाही सोबत घेतले. परळी नगर परिषदेत आज नगरसेवक वैजनाथ सोळंके यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. सोळंके हे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष आहेत. या निवडीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट, मिंधे गट, एमआयएम अशा 24 नगरसेवकांचा गट एकत्र आला. आम्हीच हिंदुत्ववादी अशी शेखी मिरवणारे मिंधे चक्क रझाकारांसोबत आले!
बीड नगर परिषदेतही अकोट पॅटर्न राबवण्यात आला. निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात तलवारी परजून उभे राहिलेले अजित पवार गट, मिंधे, एमआयएम आणि काँग्रेस हे पक्ष गटनेत्याच्या निवडीसाठी शिव-शाहू–फुले-आंबेडकरांच्या नावाखाली एकत्र आले. एरव्ही अजित पवारांच्या सोबत बसण्यासाठीही नाक मुरडणारा मिंधे गट या निवडणुकीत एमआयएम आणि अजितदादा गटाच्या मधे बसला होता. एमआयएमचे नगरसेवक सय्यद इलियास यांना या गटात येण्यासाठी अक्षरशः पायघड्या घालण्यात आल्या.
सोशल मीडियावर मिंध्यांचे धिंडवडे
बीड, परळीतील अजितदादा गट, मिंधे आणि एमआयएमच्या युतीचे प्रकरण समोर आले. स्वतःला प्रखर हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे मिंधे रझाकारांचे वारस असलेल्या एमआयएमबरोबर कसे जाऊ शकतात? असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला गेला. नेटकऱयांनीही एमआयएमसोबत जाणाऱ्या मिंध्यांना चांगलेच झोडपून काढले. सोशल मीडियावर दिवसभर मिंध्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघत होते.
हीच का तुमची वैचारिक भूमिका – अंबादास दानवे
परळी नगर परिषदेत जी युती झाली आहे ती पाहून मिंध्यांनी बंड आणि तत्त्वाच्या गप्पा कायमच्या थांबवाव्यात. राष्ट्रवादी नको नको म्हणत आता थेट एमआयएमवासी झालात. ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्याच्याशीच जमलं तुमचं! हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? परळीतल्या नव्या सत्तेच्या संसाराचा चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे अशा शब्दात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मिंधे गटाला फटकारले.






























































