
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरील वादाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. परीक्षेआधीच त्यांनी निकाल कसा समजला,असा सवला करत पेपर आधीच फुटला आहे किंवा यामागे दिल्लीतील अदृश्य शक्तींचा हात आहे, अशा शब्दांत भाजपवर हल्ला चढवला आहे. तसेच स्मार्ट सिटी, टोलमाफी हे सर्व यांची जुमलाबाजी आहे. आता भाजप म्हणजे भारतीय जनता पार्टी नसून ती भ्रष्ट जुमला पार्टी झाली आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे.
विरोधी पक्ष असलेल्यांच्या मागे आईस लागतो. आईस म्हणजे इन्कम टॅक्स,सीबीआय आणि ईडी लावतात. आता आम्हाला याची सवय झाली आहे. पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकाल मेरिटवर झाला तर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वांनाच माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली आणि पक्ष कोणाचा आहे. हे लहान लहान मुलांनाही माहिती आहे. आपल्याला निवडणूक आयोगावर विश्वास आहे. मात्र, छगन भुजबळ यांचाचगट निवडणूक आयोगाकडे गेला आहे. तसेच ही लढाई लढत असलेल्यांनाच आधीच निकाल कसा माहिती झाला. परीक्षेला बसण्याआधीच यांनाच निकाल कसा समजला, याचा अर्थ पेपर फुटलेला आहे किंवा दिल्लीतील अदृश्य शक्तींनी यांच्या कानात येऊन निकाल सांगितला आहे, याच्यात नक्कीच काहीतरी गोलमाल आहे.
आमच्याकडे पुरावे नाहीत, आम्ही पुराव्याशिवाय हवेत आरोप करत नाही. मात्र, यामागे अदृश्य शक्ती आहे, हे घडणाऱ्या घटनांवरून समजत आहे. ही दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्राविरोधात कटकारस्थान करत आहे. छगन भुजबळांकडून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात येते. मात्र, आपण भुजबळांबाबत बोलणार नाही. ते माझ्या वयाचे असते तर त्यांना करारा जवाब दिला असता, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून अन्याय झाला आहे. त्यांच्याकडे 105 आमदार असूनही त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे ते दुःखात आहेत. आपण त्यांचे दुःख समजून घेत त्यांच्याशी संवेदनपूर्ण वागले पाहिजे, असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला. राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडी निवडणुकीसाठी तयार आहे. देशात लोकशाही आहे, दडपशाही नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत.
भाजप ही भारतीय जनता पार्टी नसून ती भ्रष्ट जुमला पार्टी झाली आहे. एखाद्यावर आरोप करायचे, ते घाबरून त्यांच्याकडे गेले की वॉशिंग मशीनमधून काढून स्वच्छ करायचे, हेच त्यांचे सुरु आहे. भाजपने केलेले आरोप खरे असतील तर त्यांनी वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ केलेल्यांबाबत बोलावे, राष्ट्रवादीची माफी मागावी किंवा आरोप खोटे होते, हे मान्य करावे, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले.
ही वैयक्तीक लढाई नसून ही वैचारिक लढाई आहे. आम्ही महागाई, बेरोजगारी आणि दडपशाहीविरोधात लढत आहोत. शाळांची संख्या कमी होत असून मद्याची दुकाने वाढत आहेत, याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



























































