सीमाभागात मराठी भाषिकांच्या ‘काळा दिन’ फेरीला मज्जाव; मात्र भुवनेश्वरी पूजनास कन्नडिगांना परवानगी

यंदा कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत कर्नाटक प्रशासनाने येत्या 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे काढण्यात येणारी राज्योत्सव मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारली, मात्र भुवनेश्वरी पूजनास मात्र कन्नडिगांना थेट परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे मराठी भाषिकांना मात्र सीमाभागात काळा दिन फेरी काढण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला आहे.

सन 1956 च्या भाषिक प्रांत रचनेवेळी विरोध असुनही मराठी भाषिकांना कर्नाटकात घुसडण्यात आले. गेल्या चार पिढ्यांपासून सीमाभागातील मराठी भाषिक कानडी अत्याचार सहन करत महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. कित्येक मराठी भाषिक हुतात्मे झाले आहेत.

1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिनी सीमाभागात मराठी भाषिकांकडुन कडकडीत हरताळ व काळा दिन पाळण्यात येतो. तसेच काळी वस्त्रे परिधान करून सीमाभागात मुक सायकलफेरी काढण्यात येते. बेळगांव हे मराठी भाषिक लढ्याच्या चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दरवर्षी मराठी भाषिकांना या मुक फेरीला परवानगी देण्यास कानडी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच मुकफेरीनंतर मराठी भाषिकांवर दगडफेक करण्यासह युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून, दडपशाही करण्यात येते.

येत्या 1नोव्हेंबर रोजीच्या नियोजनासंदर्भात
बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलिस आयुक्त के. त्यागराजन, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे आदींच्या उपस्थित जिल्हा प्रशासनाची नुकतीच बैठक झाली. यामध्ये यंदा 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन दरवर्षीप्रमाणे राज्योत्सवाची मिरवणूक न काढण्याचा आणि केवळ भुवनेश्वरी पूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वांनी नियमांचे पालन करून उत्सवात सहभागी व्हायचे असल्याचे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी सांगितले. याचवेळी मराठी भाषिकांच्या काळा दिन फेरीला कदापीही परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव, शिवसेनेची मंगळवारी बैठक
सीमाभागात 1 नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव येथे शिवसेनेच्या रामलिंगखिंड गल्लीतील कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. तसेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या