
बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनाचा घाट घालणाऱ्या कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांनी आयोजित केलेला महामेळावा दडपण्याचा प्रयत्न कानडी पोलिसांनी आज केला. महामेळाव्याला आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतरही मागे न हटता स्थानबद्ध करून ठेवलेल्या ठिकाणीच सभा घेऊन मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारचे मनसुबे उधळून लावले. कर्नाटक आणि केंद्राचा निषेध करत, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में’चा निर्धार बोलून दाखवला.
महामेळाव्यास परवानगी नाकारून मराठी भाषिकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारकडून होत आहे. समितीने परवानगीसाठी रीतसर अर्ज करूनही रात्री उशिरापर्यंत परवानगी देण्यात आली नव्हती. पण मराठी भाषिकांची तयारी पाहता रात्री उशिरा बेळगाव प्रशासनाने तोंडी परवानगी दिली. मात्र, सकाळी पोलिसांनी बळाचा वापर करून पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी रस्त्यावर ठिय्या मारून कर्नाटक सरकारच्या दंडेलशाहीचा निषेध केला. यावेळी ’बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे…’ अशा घोषणांनी सीमाभाग दणाणून गेला होता. कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीविरोधात महाराष्ट्र सरकारने अधिवेशनात आवाज उठवावा, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
शिवसैनिक आक्रमक; कोल्हापुरात कर्नाटकच्या बस रोखल्या
मेळाव्यासाठी बेळगावला निघालेल्या शिवसैनिकांना व सर्वसामान्यांना कर्नाटक प्रवेशास मनाई करण्यात आली होती. त्यासाठी सर्व मार्गांवर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याचा निषेध म्हणून शिवसेनेने कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कर्नाटक परिवहनच्या बस अडवून निदर्शने केली.




























































