
पालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. बेस्टच्या 1023 बसेस, 101 एसटी बसगाडय़ा आणि 1160 खासगी बसेस निवडणूक डय़ुटीला जुंपल्या गेल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना संपूर्ण दिवसभर बेस्टच्या थांब्यांवर बसच्या प्रतीक्षेत तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. त्यांच्या गैरसोयीचा रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी गैरफायदा घेतला. ‘शेअरिंग’ तत्त्वावर प्रवासी सेवा देताना रिक्षा, टॅक्सीचालकांनी दुप्पट भाडेवसुली केली.
बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) निवडणूक कार्यालयाच्या मागणीनुसार विभागनिहाय बेस्ट, एसटीच्या बसगाडय़ा तसेच इतर खासगी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. बुधवारी एकाच दिवशी तब्बल 40 टक्के बेस्ट बसेस प्रवासी सेवेबाहेर राहिल्या. त्याचा मोठा परिणाम मुंबई शहर परिसरासह पूर्व व पश्चिम उपनगरांत दिसला. पर्ह्ट-चर्चगेटपासून ते अगदी मुलुंड, दहिसरपर्यंतच्या सर्वच बसथांब्यांवर सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तासन्तास बसच येत नव्हत्या. नंतर उशिराने आलेल्या बसगाडय़ांना खचाखच गर्दी होत होती. अनेक मुंबईकरांना बसच्या दरवाजावर लटकत कार्यालय आणि घर गाठावे लागले. एकीकडे एक हजारहून अधिक बेस्ट बस प्रवासी सेवेबाहेर होत्या. त्याचवेळी लोकलसेवेचे वेळापत्रक विस्कळीत होते. त्यामुळे मुंबईकरांनी संपूर्ण दिवसभरात रखडपट्टी, तारांबळ आणि रिक्षा-टॅक्सीचालकांनी केलेल्या मनमानी भाडेवसुलीचा मनस्ताप सहन केला. गुरुवारीदेखील हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
25 रुपयांऐवजी 50 रुपयांची वसुली!
पश्चिम आणि पूर्व उपनगरांत रिक्षाचालकांनी मुंबईकरांच्या गैरसोयीचा फायदा उठवून अक्षरशः लूट केली. अंधेरी पूर्वेकडे दररोज सकाळी आणि सायंकाळी नोकरदारांच्या बससाठी लांबलचक रांगा लागतात. अंधेरी रेल्वे स्थानक ते सीप्झपर्यंत शेअरिंग रिक्षाने जाण्यासाठी 25 रुपये घेतले जातात. बुधवारी दुप्पट म्हणजेच 50 रुपये भाडेवसुली आणि चौथ्या प्रवाशाकडून अतिरिक्त भाडे अशा प्रकारे रिक्षाचालकांनी बक्कळ कमाई केली. दुसरीकडे वडाळा, दादर, नायगाव, भायखळा, पर्ह्ट परिसरात टॅक्सीचालकांनी मुंबईकरांकडून मनमानी भाडे घेतले. निवडणूक डय़ुटीमुळे पोलीस रस्त्यावर नव्हते. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मोकळे रान मिळाल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दिली.





























































