बेस्ट कामगार सेनेच्या दणक्याने कर्मचाऱ्यांना पदोन्नती

बेस्ट उपक्रमातील कामगार वर्गाची भरती, पदोन्नती, निवृत्त कर्मचाऱयांची देयके आदी प्रलंबित प्रश्नांबाबत बेस्ट कामगार सेनेने मंगळवारी बेस्ट भवनावर धडक दिली होती. त्यावेळी एचआर विभागाने कर्मचाऱयांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू करीत एचआर विभागाने बुधवारी विद्युत पुरवठा विभागातील मीटर वाचक आणि बिल मेसेंजर पदे भरण्यासाठी परिपत्रक जारी केले.

बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत आणि सरचिटणीस रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱयांचे शिष्टमंडळ तसेच प्रत्येक आगारातील कार्यकर्ते मंगळवारी पुलाबा आगारात जमा झाले होते. शिष्टमंडळाने संबंधित अधिकाऱयांसोबत बैठक घेऊन वाहतूक, परिवहन अभियांत्रिकी, विद्युत पुरवठा विभागातील कर्मचाऱयांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली होती. त्यावेळी बेस्ट कामगार सेनेने मांडलेल्या आग्रही भूमिकेमुळे प्रशासन हादरले आणि बुधवारी तातडीने कार्यवाहीला सुरुवात केली. या कार्यवाहीबाबत बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी बेस्ट प्रशासनाचे आभार मानले.