
बेस्ट कामगारांच्या ‘दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. व्रेडिट सोसायटी’च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. मुसळधार पाऊस असूनही सर्व मतदान पेंद्रांवर चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे दिवसाखेरीस 82 टक्के मतदानाची नोंद झाली. मंगळवारी मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीच्या ‘उत्कर्ष’ पॅनेलचा विजय निश्चित मानला जात आहे.
काही महिन्यांवर येऊन ठेपलेली मुंबई महापालिकेची निवडणूक तसेच शिवसेना-मनसे युतीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक प्रतिष्ठsची बनली आहे. गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे पतपेढीवर वर्चस्व असून या निवडणुकीत ‘ठाकरे ब्रॅण्ड’ची जादू दिसणार आहे. सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरांतील एकूण 35 पेंद्रांवर मतदान पार पडले. एकूण 15093 मतदार बेस्ट कामगारांपैकी 12360 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या माध्यमातून दिवसभरात 82 टक्के मतदानाची नोंद झाली. शहरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला होता. मात्र त्या पावसातही बेस्ट कामगारांनी दिवसाच्या सुरुवातीलाच मतदान करून दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. यंदा बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना प्रणीत ‘उत्कर्ष’ पॅनेल निवडणूक रिंगणात उतरली होती. शिवसेना-मनसे युतीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले होते. सर्वच मतदान पेंद्रांबाहेर ‘उत्कर्ष’ पॅनेलचाच बोलबाला दिसून आला.
निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष
बेस्टच्या वडाळा आगारात मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पतपेढी संचालक मंडळाच्या या निवडणुकीत सुरुवातीपासून शिवसेना-मनसे युतीच्या ‘उत्कर्ष’ पॅनेलचाच दबदबा राहिला. त्यामुळे हादरलेल्या विरोधकांनी रडीचा डाव सुरू केला होता. त्या पार्श्वभूमीवर बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.